कवितेमधला थॉट महत्त्वाचा असतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:26 IST2021-03-28T04:26:55+5:302021-03-28T04:26:55+5:30
भद्रावती : ज्या कवितांना किंवा एकूणच कुठल्याही प्रकारच्या साहित्याला वैचारिक पाया नसतो, ते साहित्य कितीही संख्येने निर्माण ...

कवितेमधला थॉट महत्त्वाचा असतो
भद्रावती : ज्या कवितांना किंवा एकूणच कुठल्याही प्रकारच्या साहित्याला वैचारिक पाया नसतो, ते साहित्य कितीही संख्येने निर्माण झाले तरी काळाच्या प्रवाहात वाहून जाते. संत काव्याला त्यांचा एक वैचारिक पाया होता. त्यामुळे काळाच्या ओघातही संत साहित्य टिकून राहिले व ते साहित्य वैश्विक ठरले. थॉटफुल असलेली कबिराची कविता, नामदेव, जनाबाई, तुकारामाची कविता या संतांच्या कवितांना वैचारिक पाया असल्यामुळेच चिरंजीव व चिरंतन ठरल्या, असे प्रतिपादन स्मृतिगंध काव्य संमेलनात डॉ. विद्याधर बनसोड यांनी केले.
स्वर्गीय वीणा आडेकर स्मृती प्रतिष्ठान भद्रावतीच्या वतीने स्थानिक मुरलीधर पाटील गुंडावार सभागृह येथे आयोजित चौथ्या स्मृतिगंध काव्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात संमेलनाध्यक्ष पदावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आचार्य ना. गो. थुटे व पंचायत समिती भद्रावतीचे सभापती प्रवीण ठेंगणे उपस्थित होते.
कोविड १९ दिवंगत योद्धांच्या स्मृतीस समर्पित असलेल्या या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते पुढे म्हणाले, कोरोनाने आपल्याला एक गोष्ट शिकवली की कोणताही देव माणसाच्या मदतीला येत नाही तर माणूसच माणसाच्या मदतीला धावून जातो आणि माणूस माणसाच्या मदतीला माणूस म्हणून धावून येणे हे उच्च संस्कृतीचे लक्षण आहे. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात संमेलनाध्यक्ष डॉक्टर विद्याधर बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कविसंमेलन पार पडले. सर्वच कवींनी आशयघन कवितांच्या सादरीकरणातून या कविसंमेलनात रंगत भरली. मंगेश जनबंधू यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
बॉक्स
या साहित्याचे झाले लोकार्पण
उद्घाटन सत्रात डॉक्टर विद्याधर बनसोड लिखित प्रश्न पाणी बदलण्याचा(कवितासंग्रह), पिलांटू(बालकादंबरी), कोर कोंडा(कादंबरी), मयताचे कपडे(कथासंग्रह), आमची थायलंड वारी (प्रवास वर्णन), तथागताचे दृष्टांत या साहित्यकृतींचा लोकार्पण सोहळा पार पडला.