लसीकरण केंद्रात संचारबंदीचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:28 IST2021-04-21T04:28:18+5:302021-04-21T04:28:18+5:30
चंद्रपूर : कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत लसीकरण हा एकमेव पर्याय नागरिकांकडे आहे. मात्र, पाहिजे त्या ...

लसीकरण केंद्रात संचारबंदीचे तीनतेरा
चंद्रपूर : कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत लसीकरण हा एकमेव पर्याय नागरिकांकडे आहे. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात लस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची निराशा होत आहे. दरम्यान, सोमवारी बहुतांश केंद्र बंद होते. त्यानंतर जिल्ह्यात १४ हजार डोस प्राप्त होताच मंगळवारी लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र, या केंद्रावर तोबा गर्दी उसळल्यामुळे चंद्रपुरात लसीकरण केंद्रावर संचारबंदीचे तीनतेरा वाजल्याचे बघायला मिळाले.
शहरातील मातोश्री शाळा, टागोर शाळा तसेच अन्य केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. दरम्यान, नागरिकांनी सकाळपासून या केंद्रावर गर्दी केली होती. मातोश्री शाळेत तर भरपूर गर्दी झाली होती. या गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे जो तो नागरिक लस घेण्यासाठी धडपड करीत होता. यामध्ये मात्र कोरोना संक्रमण होणार हे सर्वजण विसरल्याचे चित्र या केंद्रावरील झालेली गर्दी बघून पहायला मिळाले. विशेष म्हणजे, या केंद्राच्या जवळ असलेल्या पोलीस रुग्णालयातील लसीकरण केंद्र बंद होते. त्यामुळे प्रत्येकजणाची धाव मातोश्री शाळेतील केंद्राकडेच होती.
बाॅक्स
सकाळपासून नागरिकांच्या रांगा
जिल्ह्यात १४ हजार डोस प्राप्त झाल्याची माहिती नागरिकांना होताच बहुतांश जणांनी ऑनलाईन नोंदणी करणे सुरू केले. मात्र, यातील बहुतांश केंद्र बंद असल्याचे दाखविताच नागरिकांनी प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन रांगा लावणे सुरू केले. सकाळपासून या केंद्रावर रांगा बघायला मिळाल्या.
बाॅक्स
टागोर शाळेत योग्य नियोजन
येथील टागोर शाळेमध्येही सकाळपासून लसीकरणाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रथम येणाऱ्या १०० जणांना चिठ्ठी स्वरूपात टोकन दिले. त्यामुळे नंबरनुसार लसीकरण करण्यात आले. १०० च्या वरील नागरिकांना घरी जाण्यास सांगण्यात आले. त्यामुळे सकाळी या केंद्रावर झालेली गर्दी टोकन मिळाल्यानंतर मात्र कमी झाल्याचे बघायला मिळाले. विशेष म्हणजे, नंबर दिल्यामुळे मध्ये कुणालाही एन्ट्री नसल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
बाॅक्स
मातोश्री शाळेत गर्दी
तुकूम परिसरातील मातोश्री शाळेत सकाळपासून तुफान गर्दी बघायला मिळाली. विशेष म्हणजे, बहुतांश नागरिकांनी शाळेच्या बाहेरच वाहने पार्क केल्याने या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या परिसरामध्ये ना कोरोनाची दहशत ना संचारबंदीची, अशी काहीशी अवस्था होती.