‘ते’ क्षण आठविले की अजूनही उठतात रोमांच !

By Admin | Updated: July 26, 2014 01:46 IST2014-07-26T01:46:59+5:302014-07-26T01:46:59+5:30

‘ते’ दिवस आणि क्षण आठवले की अजूनही अंगावर

'They' Moment That Moment Will Still Stand Up Thrill! | ‘ते’ क्षण आठविले की अजूनही उठतात रोमांच !

‘ते’ क्षण आठविले की अजूनही उठतात रोमांच !

विजयाचे साक्षीदार : चंद्रपुरात घडविताहेत सैनिक
चंद्रपूर :
‘ते’ दिवस आणि क्षण आठवले की अजूनही अंगावर रोमांच उठतात. ते तोफांचे वर्षाव, मशिनगन्सचे आवाज आजही कानात गुंजतात. विजयाच्या ध्येयाने झपाटलेल्या आमच्या मनांनी अखेर कारगिलवर विजय मिळविला. तो अत्यानंदाचा क्षण आठविला की डोळ्यापुढे डौलाने फडकणारा तिरंगा येतो आणि आपोआपच गर्वाने माना उंच अन् ताठ होतात.
या आठवणी आहेत कारगिल मोहिमेत सहभागी होऊन विजयी ठरलेल्या मेजर हरजिंदर सिंग, कमलसिंग थापा आणि दीपक भोयर यांच्या. हे तिघेही हिंमतबाज सैनिक सध्या चंद्रपुरातील सन्मित्र सैनिकी विद्यालयात शिकवित आहेत. चंद्रपुरातील भावी सैनिकांना आतापासूनच घडविण्याचे काम करीत आहेत.
२६ जुलै हा कारगिल विजय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याने मिळवलेल्या विजयाचे आणि विरांच्या बलिदानाचे स्मरण यासाठी हा विजयोत्सव असतो. १९९९ मध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानची घुसखोरी पूर्णपणे निपटून काढून जो विजय मिळवला. तो प्रतिदिनी सैनिकी प्रशिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या आणि सैन्यात जावून शौर्य गाजवायचे स्वप्न पाहणाऱ्या सन्मित्र सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहे. रोज हे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक स्वत: या युद्धात सहभागी होते ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब आहे. या सैनिकांनी कारगिल युद्धाच्या आठवणी सांगितल्या.
सध्या सन्मित्र सैनिकी विद्यालयाचे समादेशक असलेले मेजर हरजिंदर सिंह हे त्यावेळी भारतीय सैन्यात बॅट्री कमांडर यापदावर नियुक्त होते. शत्रूवर नजर ठेवायची, त्यांची विमानं भारतीय हद्दीत घुसू नयेत, घुसली तर त्यांचा वेध घेवून तोफांचा मार करुन ते विमान पाडायचं या अवघड आणि तेवढ्याच जवाबदारीच्या कामाला त्यांनी शौर्याने न्याय दिला. राशन म्हणजे शिधा कमी पडला तरी चालेल पण दारुगोळा कमी पडू नये यासाठी त्यांनी शिध्याच्या पिशव्याही रिकाम्या करून त्यात दारुगाळा भरुन घेतला होता. मेजर हरजिंदर सिंह आपले अनुभव सांगतांना तो प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यांपुढे उभा करत होते.
सैनिकी निदेशक म्हणून सन्मित्र सैनिकी विद्यालयात नुकतेच रुजू झालेले कमलसिंह थापा यांचाही कारगिल युद्धात म्हणजेच आॅपरेशन विजमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता. १९ बटालियन जम्मू काश्मीरमध्ये कमलसिंह त्यावेळी सुभेदार पदावर कार्यरत होते. कारगिलचे युद्ध त्यांनी खूप जवळून अनुभवले. त्या प्रसंगाचे वर्णन करताना सहकाऱ्यांच्या आठवणींनी त्यांचे मन हेलावत होते आणि त्या विजयश्रीच्या स्मरणाने त्यांचा उर अभिमानाने फुलून येत होता. शत्रू उंचावर असल्यानं शत्रुला मारा करणे सोपी नव्हते. नैसर्गिक परिस्थिती भारतीय सैन्याला प्रतिकूल होती. पण भारतीय सैन्याची हिंमत प्रचंड होती. मशिनगन्सची फायरिंग आणि तोफांच्या माऱ्यात कमलसिंह थापा यांनी ट्रास- बटालिक या क्षेत्रात शत्रूवर चढाई करून त्यांना धूळ चारली.
दीपक भोयर हे मूळ चंद्रपूरर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीचे. कारगिल युद्धादरम्यान ते श्रीनगर येथे भारतीय वायुदलात सार्जंट म्हणून कार्यरत होते. तांत्रिक सेवेच्या माध्यमातून वायूदलाच्या लढाऊ विमानांमध्ये संपर्क ठेवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. ते सध्या सन्मित्र सैनिकी विद्यालयात सैनिकी निदेशक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वात चंद्रपुरातील भावी सैनिक घडत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
चंद्रपूर जिल्ह्यातल्या दीपक भोयर यांच्यासह मूळ पंजाबचे हरजिंदर सिंह, हिमाचल प्रदेशातले कमलसिंह थापा हे तिघेही सैन्यातून निवृत्त होऊन सन्मित्र सैनिकी विद्यालयात उद्याचे सैनिक घडवत आहेत. देशसेवा हेच जीवनाचं ध्येय समजून कार्य करण्यातच सार्थकता मानणारे हे तिघेही निवृत्तीनंतरच सुखासीन आयुष्य जगत राहण्याची चाकोरी नाकारुन या कार्याच्या निमित्तानं देश सेवाच करीत आहेत. प्रत्यक्ष जीवनात आदर्श ठरावेत, असे हे तिघेही त्यांच्या वाट्याला आलेलं काम हे त्याचं कर्तव्यच होतं या भावनेने बोलत होते. आज सैन्यदलात अनेक संधी असूनही तरुणवर्ग त्याकडे आकर्षित होत नसल्याची खंत त्यांना आहे. या प्रेरणादायी क्षेत्रात तरुणांनी कारकीर्द घडवावी, असे त्यांना मनापासून वाटते.

Web Title: 'They' Moment That Moment Will Still Stand Up Thrill!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.