साडेचार कोटींचे सुसज्ज बसस्थानक होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:01 IST2020-08-18T05:00:00+5:302020-08-18T05:01:43+5:30
नागभीड येथे बसस्थानक आहे. मात्र, ते शहराच्या बाहेर आहे. हे बसस्थानक प्रवाशी आणि महामंडळाच्याही गैरसोयीचे होते. त्यामुळे प्रवाशी या बसस्थानकावरून प्रवास करणे टाळले. निर्मितीनंतरच्या काही वर्षातच महामंडळाने या बसस्थानकात बस पाठविणे बंद केले. त्यामुळे हे बसस्थानक काही वर्षांपासून अडगळीत पडले आहे.

साडेचार कोटींचे सुसज्ज बसस्थानक होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : जागेचे हस्तांतरण झाल्याने येथील प्रस्तावित सुसज्ज बसस्थानकाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. विश्रामगृहाच्या जागेवर आता नवीन सुसज्ज बसस्थानकाची उभारणी होणार आहे. बांधकामास प्रशासकीय मान्यताही मिळाली. सर्व सोईसुविधायुक्त बसस्थानकाच्या बांधकामासाठी ४ कोटी ३३ लाख ६० हजारांचा खर्च होणार आहे.
नागभीड येथे बसस्थानक आहे. मात्र, ते शहराच्या बाहेर आहे. हे बसस्थानक प्रवाशी आणि महामंडळाच्याही गैरसोयीचे होते. त्यामुळे प्रवाशी या बसस्थानकावरून प्रवास करणे टाळले. निर्मितीनंतरच्या काही वर्षातच महामंडळाने या बसस्थानकात बस पाठविणे बंद केले. त्यामुळे हे बसस्थानक काही वर्षांपासून अडगळीत पडले आहे. एवढेच नाही तर या बसस्थानकाची इमारत आता जीर्ण होऊ लागली आहे. नागभीड शहरात मध्यवर्ती ठिकाणी बसस्थानक असावे, असा विचार पुढे आला. नगर परिषदेचे उपाध्यक्ष गणेश तर्वेकर यांनी येथील विश्रामगृहाच्याजागेवर बसस्थानकाची निर्मिती व्हावी, याकरिता सतत पाठपुरावाही केला. या प्रयत्नांची फलश्रुती म्हणून बसस्थानकाला मंजुरी मिळाली आणि बसस्थानकही सुरू झाले. आता जागेच्या हस्तांतरणाचा प्रश्नही निकालात निघाल्याने भव्य बसस्थानकाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रस्तावित बसस्थानकाची जागा नागपूर-नागभीड राष्ट्रीय महामार्गावर आणि मध्यवर्ती ठिकाणी आहे. येथील बसस्थानकाचे काम पूर्ण झाल्यास तालुक्यातील नागरिकांसह शाळा व महाविद्यालयात विद्यार्थ्यांची समस्या कायमची दूर होणार आहे.
शहरात मध्यवर्ती ठिकाणी बसस्थानक असावे, अशी नागरिकांची अनेक दिवसांची मागणी होती. ती मागणी पूर्ण करता आली, याचा मला आनंद आहे.
-कीर्तीकुमार भांगडिया
आमदार, चिमूर विधानसभा.