जिल्हा मार्गाला जोडणाऱ्या सहा मार्गांची होणार सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2016 01:56 IST2016-12-22T01:56:30+5:302016-12-22T01:56:30+5:30
चिमूर विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या व प्रमुख जिल्हा मार्ग ३८ ला जोडणाऱ्या सहा पोच मार्गाची सुधारणा लवकरच केली जाणार असून

जिल्हा मार्गाला जोडणाऱ्या सहा मार्गांची होणार सुधारणा
कीर्तीकुमार भांगडिया : दहा किमीसाठी पाच कोटींचा निधी
चिमूर : चिमूर विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या व प्रमुख जिल्हा मार्ग ३८ ला जोडणाऱ्या सहा पोच मार्गाची सुधारणा लवकरच केली जाणार असून यासाठी शासनाच्या रस्त्यांचे संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत पाच कोटी ७९ लाखांंचा निधी नुकताच मंजूर करण्यात आल्याची माहिती आ. किर्तीकुमार भांगडिया यांनी दिली आहे.
या सहा मार्गाची सुधारणा झाल्याने ते प्रमुख जिल्हा मार्गाला जोडले जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्थेने नुकतेच अधीक्षक अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकडे नुकतेच वर्ग केले.
चिमूर ही क्रांतिभूमी असली तरी चिमूरचा विकास गेल्या कित्येक वर्षापासून खुंटलेला होता. शासनाचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत होते. परंतू राज्यात भाजपा महायुतीची सत्ता स्थापन झाल्यावर व या मतदार संघाचे नेतृत्व आ. किर्तीकुमार भांगडिया यांच्याकडे आल्याने शेकडो विकासाची कामे हाती घेण्यात आली. चिमूरला नगरपालिकेचा दर्जा देणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची तपोभूमी गोंदोडा गुंफेचा सर्वांगिण विकास करणे, श्रीहरी बालाजी यांच्या अधिनस्त असणाऱ्या बालाजी सागराचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करणे, नागभीडला नगरपालिका स्थापन करणे असे अनेक ऐतिहासिक निर्णय आ. किर्तीकुमार भांगडिया यांच्या भगिरथ प्रयत्नाने पूर्णत्वास आले आणि आता प्रमुख जिल्हा मार्ग ३८ ला जोडणाऱ्या विविध गावातील पोचमार्गाचे काम हाती घेण्यात येत आहे. यात प्रामुख्याने तुकूम, बामणी, तळोधी, टेकेपार, सातारा व मासळ या गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, तुकूम येथील पोचमार्गाची सुधारणा झाल्यानंतर या रस्त्यामुळे ताडोबा व्याघ्रप्रकल्प पर्यटनास फायदा होणार आहे. एक किमीचा हा रस्ता संपूर्ण सिमेंट काँक्रीटचा प्रस्तावित असून या रस्त्यावर ५०० मीटर पक्क्या नालीचे बांधकामही घेण्यात आले आहे. उपलब्ध निधीतून रस्त्याचा विकास होत असताना पुढील पाच वर्ष या रस्त्याची देखभाल व दुरुस्तीसाठी मोठी तरतूद केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
ग्रामीणांचे उत्पन्न वाढविण्यास रस्ते आवश्यक
शहराचा विकास कितीही झाला तरी जोपर्यंत शहर मजबूत रस्त्याच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्राला जोडले जात नाही, तोपर्यंत विकास झाला असे म्हणता येणार नाही. जिल्ह्यातील प्रमुख मार्गाला गावातून येणारे महत्त्वपूर्ण रस्ते योग्य स्थितीत असतील तर ग्रामीणांसाठी ते दळणवळणाचे प्रमुख साधन होऊन जाते. यामुळे ग्रामीण भागातील व्यक्ती थेट शहराशी जोडला जातो. त्याचा सकारात्मक परिणाम त्याच्या उत्पन्न वाढीवर होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व रस्ते दीर्घकाळ टिकणारे आणि प्रमुख मार्गाला जोडणारे असावे. ग्रामीणांचे उत्पन्न वाढविण्यासाठी रस्ते मजबूत असणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया आ. किर्तीकुमार भांगडिया यांनी दिली.