मराठा-ओबीसींमध्ये संघर्ष होणार नाही: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 09:46 IST2023-10-01T09:45:49+5:302023-10-01T09:46:11+5:30
चंद्रपूरचेही उपोषण मागे

मराठा-ओबीसींमध्ये संघर्ष होणार नाही: देवेंद्र फडणवीस
चंद्रपूर : राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य सरकारची भूमिका आहे, पण त्याचवेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाज एकमेकांच्या विरोधात उभा राहतील, अशा प्रकारची परिस्थिती राज्यात तयार होऊ नये याची काळजी राज्य सरकार निश्चितपणे घेणार आहे, अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसी समाजाला दिली.
राज्य सरकार आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रतिनिधींसोबत शुक्रवारी झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपुरात ११ सप्टेंबरपासून सुरू असलेले रवींद्र टोंगे, विजय बल्की व प्रेमानंद जोगी यांचे अन्नत्याग आंदोलन लिंबू सरबत पाजून सोडविले.
यावेळी ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी राज्यात जिथे कुठे ओबीसींचे आंदोलन सुरू आहे ते आजपासून मागे घेण्यात आल्याची घोषणा केली.
ओबीसी वसतिगृहे लवकरच सुरू करणार आहे. वसतिगृहात ज्यांना प्रवेश मिळणार नाही अशांना स्वाधारसारखी योजना करून बाहेर राहण्याकरिता पैसे उपलब्ध करून देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतलेला आहे. ओबीसी समाजाकरिता दहा लाख घरांची योजना राज्य सरकारने आखलेली आहे. राज्य सरकारला ओबीसींचे हितच करायचे आहे यासाठी ओबीसी महासंघाने राज्य सरकारसोबत समन्वय साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.