वीज केंद्रातील कोळशाची चोरी
By Admin | Updated: January 24, 2016 00:53 IST2016-01-24T00:53:10+5:302016-01-24T00:53:10+5:30
चंद्रपूर वीज केंद्रात कोळसा न आणता केवळ बनावट स्वाक्षरी व शिक्कयाची पावती पाठवून कोळशाची चोरी होत असल्याची बाब उजेडात आली आहे.

वीज केंद्रातील कोळशाची चोरी
लाखोंचा गैरव्यवहार : पोलिसात तक्रार
दुर्गापूर : चंद्रपूर वीज केंद्रात कोळसा न आणता केवळ बनावट स्वाक्षरी व शिक्कयाची पावती पाठवून कोळशाची चोरी होत असल्याची बाब उजेडात आली आहे. पावतीच्या आधारे कोळसा आल्याचे दाखवून हा कोळसा पडोली परिसरात विकला जात असल्याचीही माहिती आहे. याबाबत दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चंद्रपूर वीज केंद्रात भटाळी कोळसा खाणीतून ट्रकद्वारे कोळशाचा पुरवठा केला जातो. कोळसा वाहतूक करण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीकडे आहे. भटाळी कोळसा खाणीतून कोळसा भरून निघालेला ट्रक वीज केंद्रात जातो. यावेळी भटाळी ब्रिजवर ट्रकचे वजन केले जाते व पावती दिली जाते. मात्र कोळसा भरलेला ट्रक वीज केंद्रात न येता पडोली परिसरात जात असल्याची माहिती आहे. याबाबत सुरक्षा विभागाला माहिती मिळताच त्यांनी चौकशी केली. तेव्हा पावत्यांवर बनावट सही व शिक्का आढळून आला. याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. (वार्ताहर)