आईने पैसे दिले नाही म्हणून युवकाने लावला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 20:20 IST2022-04-06T20:20:00+5:302022-04-06T20:20:25+5:30
Chandrapur News आईने पैसे दिले नाहीत म्हणून नाराज झालेल्या युवकाने घरात जाऊन पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

आईने पैसे दिले नाही म्हणून युवकाने लावला गळफास
चंद्रपूर: आईला पैसे मागितले असता आईने नकार दिला. त्यामुळे संतप्त युवकाने घरातील खोलीत पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना चिमूर शहरातील वडाळा पैकू येथील श्रावस्तीनगर येथे बुधवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. आई घरकाम आटोपून घरातील खोलीत गेली असता ही घटना उघडकीस आली.
सोनू ऊर्फ मितेश प्रदीप गौरकार (२७), असे मृतक युवकाचे नाव आहे. बुधवार दुपारी १२ वाजेच्या सुमारास घराच्या बाहेरील भागात सोनूची आई धान्य साफ करीत होती. सोनूने आईला पैशाची मागणी केली असता आईने वडिलांना पैसे मागण्यास सांगितले. सोनूला याचा राग आला आणि त्याने घरातील मधल्या खोलीमध्ये जाऊन ओढणीने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. अर्ध्या तासांनी मुलगा काय करीत आहे, हे बघण्याकरिता आई आत गेली असता सोनू गळफास घेऊन पंख्याला लटकताना दिसताच आईने हंबरडा फोडला. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना होताच चिमूर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आला. मृतकाचे वडील शिक्षक आहेत. त्यांना सोनू हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.