मूळगावी पोहोचल्याचा आनंद शब्दातीत; युक्रेनमधून परतलेला हर्षल आनंदाने गहिवरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 21:33 IST2022-03-02T21:32:29+5:302022-03-02T21:33:17+5:30
Chandrapur News रशियाच्या संघर्षानंतर अनेक अडचणींना तोंड देत बुधवारी (दि. २) सकाळी मूळगावी सुखरूप पोहोचलो. याचा अतिशय आनंद होत आहे अशी भावना हर्षल ठवरे या विद्यार्थ्याने ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.

मूळगावी पोहोचल्याचा आनंद शब्दातीत; युक्रेनमधून परतलेला हर्षल आनंदाने गहिवरला
चंद्रपूर : युक्रेन - रशियाच्या संघर्षानंतर अनेक अडचणींना तोंड देत बुधवारी (दि. २) सकाळी मूळगावी सुखरूप पोहोचलो. याचा अतिशय आनंद होत आहे. मात्र, माझे रूममेट तेथेच अडकल्याचे दुःखही आहे, अशी भावना हर्षल ठवरे या विद्यार्थ्याने ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.
एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षासाठी हर्षल टर्नोफिल शहरात होता. त्याने आधीच १० मार्चला मूळगावी परतण्याची तयारी केली होती, विमानाचे तिकीटपण काढले. मात्र, २४ फेब्रुवारीला कीव्ह शहरावर रशियाने हल्ला केल्याचा संदेश आला. रात्री खिडकी, दरवाजे बंद करून बेसमेंटमध्ये राहण्याच्या सूचना मिळाल्या. २५ फेब्रुवारीला बॅग भरून पोलंडला नेऊ असे सांगितले; पण विद्यार्थी जास्त असल्याने २६ तारखेला रोमोनिया देशाच्या बॉर्डरवर नेण्यात आले. यासाठी चार तास रांगेत अन्न, पाण्याविना राहावे लागले. रात्री १२.३० वाजता बॉर्डर पार करून रोमाेनियात गेलो. सीमेपार भारतीय दूतावासाने व्यवस्था केली आणि २७ फेब्रुवारीला दिल्लीत पोहोचल्याचे हर्षलने सांगितले.
मनाचा थरकाप उडत होता
कुठेही बॉम्बस्फोट होत होते. मनात भीती निर्माण झाली. आता भारतात परत कसे जायचे, या चिंतेने मनाचा थरकाप उडत होता. एकामागून एक होणाऱ्या बॉम्बस्फोटाचे आवाज अजूनही कानात गुंजत आहेत, अशी आपबिती युक्रेनवरून परतलेल्या वरोरा येथील आदिती सायरे हिने सांगितली. आदिती अनंत सायरे ही युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला आहे. खारकीव्हमध्ये रशियन सैन्याने बॉम्ब टाकल्याची वार्ता कानावर पडली आणि भीती वाटायला लागली. त्याच रात्री एवनोचे विमानतळ रशियन सैन्याने बेचिराख केले. त्यामुळे आता बाहेर कसे पडावे, याची काळजी वाटायला लागली. भारतीय दूतावासाच्या सांगण्यावरून रोमानियात पोहोचलो. तेथील नागरिकांनी आमची केलेली व्यवस्था व मदत ही शब्दात सांगू शकत नाही, असेही ती म्हणाली.