नवनिर्माणाधीन न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर आढळला युवतीचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2022 20:59 IST2022-12-06T20:58:28+5:302022-12-06T20:59:06+5:30
Chandrapur News चंद्रपूर येथील नवनिर्माणाधीन न्यायालयाच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत युवतीचा मृतदेह मंगळवारी पहाटे आढळला.

नवनिर्माणाधीन न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर आढळला युवतीचा मृतदेह
चंद्रपूर: येथील नवनिर्माणाधीन न्यायालयाच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत युवतीचा मृतदेह मंगळवारी पहाटे आढळला. तिच्या दोन्ही पायावर बँडेज असल्याने घातपाताचा संशय व्यक्त होत आहे.
पौर्णिमा मिलिंद लाडे (वय २७, गडचिरोली) असे मृत युवतीचे नाव आहे. शवविच्छेदनानंतर त्या मुलीने आत्महत्या केल्याचा संशय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. न्यायालयाच्या मागील बाजूला मुख्य महामार्गालगत न्यायालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. प्रवेशद्वाराचे कामही करण्यात येत आहे. याच प्रवेशद्वाराला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
पायावर बनावट बँडेज?
तरुणीच्या दोन्ही पायांवर बँडेज आढळून आले. मात्र, शवविच्छेदनानंतर पायावर कोणतीही जखम नसून, ते बँडेज बनावट असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. एका युवकासोबत त्या तरुणीचे लग्न ठरले होते. साक्षगंधही झाला होता. मात्र, काही कारणांनी ते लग्न तुटले असल्याची माहिती समोर आली आहे. तो न्यायालयातच कर्मचारी असल्याची चर्चाही होती.