वाघाची डरकाळीने वरोरा तालुक्यातील गावात दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:01 IST2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:01:13+5:30
सद्या शेतीचा हंगाम असून शेतात गहू, चणा, कापूस आदी पिके उभी आहेत. शेतकरी पिकाच्या मशागतीमध्ये व्यस्त असताना वरोरा तालुक्यातील शेंबळ करंजी, वायगाव, बेंबळ, बोरगाव (शि) आदी गावाच्या शेत शिवारात वाघाने धुमाकुळ घालणे सुरू केले आहे. सद्या वाघाने गाय व बैलावर हल्ले केले आहेत. वरोरा तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना वाघाने दर्शन दिले आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले असून कापूस वेचणीकरिता मजूर मिळणे कठीण झाल्याचे दिसून येत आहे.

वाघाची डरकाळीने वरोरा तालुक्यातील गावात दहशत
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात शेतातील पिकांची काढणीसाठ शेतकरी व्यस्त असताना वरोरा तालुक्यातील अनेक गावाच्या शिवारात वाघाची दहशत आहे. सद्यातरी पाळीव प्राण्यांवर हल्ला करणे सुरू केल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक वाघाच्या दहशतीखाली असून बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.
सद्या शेतीचा हंगाम असून शेतात गहू, चणा, कापूस आदी पिके उभी आहेत. शेतकरी पिकाच्या मशागतीमध्ये व्यस्त असताना वरोरा तालुक्यातील शेंबळ करंजी, वायगाव, बेंबळ, बोरगाव (शि) आदी गावाच्या शेत शिवारात वाघाने धुमाकुळ घालणे सुरू केले आहे. सद्या वाघाने गाय व बैलावर हल्ले केले आहेत. वरोरा तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना वाघाने दर्शन दिले आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले असून कापूस वेचणीकरिता मजूर मिळणे कठीण झाल्याचे दिसून येत आहे. एकटी व्यक्ती शेतीकडे जात नाही. सायंकाळी लवकरच घराकडे परत येत असल्याने शेतातील कामावर त्याचा विपरित परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे.
वायगाव, बेंबळ, बोरगाव या गाव परिसरात वाघाने बस्तान मांडले असल्याने वाघ केव्हा येईल, याचा नेम नसल्याने शेतकरी वर्ग चांगलाच धस्तावला आहे. वन विभागाने वाघ वावरत असलेल्या ठिकाणी रात्र व दिवसा गस्त करणे सुरू केल्याने ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा
बोरगाव (शि) येथील शेतशिवारात वाघ आल्याचे नागरिकांना दिसताच त्याला हुसकावून लावले. अशातच शेतात बांधून असलेल्या बैलाने दोर तोडला. त्याच्या तोंडाला दुखापत झाली. ही दुखापत वाघाने हल्ला केल्याने झाल्याची माहिती पंचक्रोशीत पोहचली. त्यानंतर शेतमालक अशोक खंगार यांनी बैल बांधून असलेल्या ठिकाणी शहानिशा केली तर बैलाने दोर तोडल्याने त्याला दुखापत झाल्याचे त्यांना दिसले. येथेही त्यांनी आपला प्रामाणिकपणा सिद्ध करुन दाखविला.
जंगलामध्ये पाळीव प्राणी गेल्यानंतर जंगली प्राण्याने हल्ला केल्यास त्या पशुधन मालकाजवळ चराई पास असणे आवश्यक आहे.
- किरण धानकुटे
वनपरिक्षेत्र अधिकारी, खडसंगी.