देश महासत्ता होण्यासाठी सर्व भेद संपुष्टात आणा
By Admin | Updated: January 23, 2016 01:20 IST2016-01-23T01:20:06+5:302016-01-23T01:20:06+5:30
देश महासत्ता होण्यासाठी समाजाने स्त्रियांबाबतचा दृष्टीकोन बदलून व मानवनिर्मित सर्व भेद संपुष्टात आणून एकरस,

देश महासत्ता होण्यासाठी सर्व भेद संपुष्टात आणा
शिवराय कुळकर्णी : युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला
भद्रावती: देश महासत्ता होण्यासाठी समाजाने स्त्रियांबाबतचा दृष्टीकोन बदलून व मानवनिर्मित सर्व भेद संपुष्टात आणून एकरस, एकसंघ समाजाची निर्मिती करण्याची आज गरज असल्याचे मत भाजपा प्रदेश प्रवक्ते तसेच व्याख्यानकर्ते शिवराय कुळकर्णी यांनी व्यक्त केले.
लोकसेवा मंडळ, भद्रावतीचे संस्थापक अध्यक्ष स्व. निळकंठराव उपाख्य बाबुराव पाटील गुंडावार यांच्या जयंती समारोहानिमित्त स्थानिक लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद’ या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शिवराय कुळकर्णी यांनी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले. व्याख्यानमालेचे हे १० वे वर्षे आहे.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी आमदार नागो गाणार होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शरदचंद्र सालफळे, लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, सचिव मनोहर पारधे, शाळा समिती अध्यक्ष विकास उपगन्लावार, प्राचार्य विनोद पांढरे उपस्थित होते.
पुढे बोलताना शिवराय कुळकर्णी म्हणाले, स्वामी विवेकानंद यांनी आपल्या आयुष्यात भारताच्या अवनतीची काही प्रमुख कारणे सांगितली. त्यातील दोन प्रमुख कारणांचा संदर्भ आजही लागू पडतो. महिलांची स्थिती अधिकाअधिक सुधारुन त्या सक्षम होणे हे सुदृढ समाज निर्मितीसाठी आवश्यक आहे. भेदभावयुक्त समाज हे आजच्या अधोगतीचे मुख्य कारण आहे. यावर आजही विचार केला तर आम्ही मानसिकतेच्या पातळीवर बदलले आहोत का, असा प्रश्न याप्रसंगी शिवराय कुळकर्णी यांनी उपस्थित केला.
शनिदेवाच्या चौथऱ्यावर एखादी महिला चढते व समाज आकांततांडव करायला लागते, या घटनेवरुन आमचा आजही महिलांकडे बघण्याचा दृष्टीकान काय आहे, हे स्पष्ट होते. स्वामी विवेकानंदानी समरस समाज निर्मितीसाठी भरीव प्रयत्न केले. रुढी, परंपरा, कुप्रथा मोडीस आणून भारताच्या संस्कृतीच्या आधारे जगात ममता व बंधूभाव स्थापित केला जावू शकतो, हा त्यांचा दृढ विश्वास होता. किंबहुना त्यांनी शिकागोच्या धर्मपरिषदेनंतर ते सिद्धच करुन दाखविले. आजही भोगवादाच्या आहारी गेलेले देश विस्फोटकावर आरुढ झाले आहेत.
त्यावर केवळ भारतीय संस्कृतीचा आध्यात्मिक विचार हाच एकमेव उपाय असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणूनच संपूर्ण जगाच्या आशा भारताकडे केंद्रीत झाल्या आहेत, असे ते म्हणाले. धर्मातील शास्वत काय व परिवर्तनीय काय, याचा धर्ममार्तडांनी व समाज धुरीणांनी एकत्रीत येवून विचार केला पाहिजे व कालसंगत बदलही घडवून आणले पाहिजे. समाजाच्या उत्कर्षासाठी हे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
आज समाजाला अशा प्रकारच्या व्याख्यानमालेची गरज आहे. त्यातून बोध घ्यावा. भारतीय संस्कृतीची ओळख विसरत चालल्याची खंत कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. नागो गाणार यांनी व्यक्त केली. विवेकानंदाचे विचार प्रेरणादायी ठरु शकतात. म्हणून ते सर्वांनी आत्मसात करावे, असे ते म्हणाले,
कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुरेश परसावार, प्रास्ताविक प्राचार्य विनोद पांढरे तर आभार अविनाश पाम्पट्टीवार यांनी मानले. व्याख्यानमालेच्या सुरुवातीला शारदास्तवन, स्वागत गित तसेच स्व. निळकंठराव गुंडावार यांच्या जीवन कार्यावर आधारित गौरवगीत झाले. ९ वीची विद्यार्थिनी मोनाली बतकी हिने स्व. निळकंठराव गुंडावार यांच्या जीवन कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी लोकसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष बबनराव गुंडावार, विठ्ठल पारधे, मधुकर नारळे, विठ्ठल पारधे, मधुकर नारळे, विश्वनाथ पत्तीवार, उपप्राचार्य रेखा पवितवार, पर्यवेक्षक गोपाल ठेंगणे, पर्यवेक्षक चंद्रकांत देशपांडे तसेच मोठ्या प्रमाणात श्रोता वर्ग उपस्थित होता. (तालुका प्रतिनिधी)