शशिकांत गणवीर लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : यावर्षीच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, शेतकरी बि-बियाण्यांची जुळवाजुळव करण्यात गुंतला आहे. काही प्रमाणात पाऊस झाल्याने नांगरणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र यावर्षी मागील वर्षीपेक्षा बियाण्यांच्या किमतीमध्ये दहा टक्क्यांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे खरीप पिकाबाबतचे नियोजन भरकटलेले असून, शेतकऱ्यांची अर्थकोंडी होताना दिसत आहे. परिणामी शेतकरी हतबल झाले आहेत.
कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. अशातच शेतीकरिता लागणारा उत्पादन खर्च वाढल्याने व अपेक्षित शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा गुंता वाढत असून, शेती परवडण्यासारखी राहिलेली नाही. मागील वर्षी धनाचे भाव तीन हजारांवर गेले होते. मात्र, यंदा दोन हजार ७०० ते दोन हजार ८०० वर भाव स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. असे असताना यंदा शासनाने हमीभावावर केवळ ६९ रुपयांची वाढ केली, तर बियाण्यांच्या किमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाल्याने शासनाचे धोरणच शेतकऱ्यांसाठी मारक ठरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मजूरच्या दरातही वाढखरीप हंगामाला सुरुवात झाली असल्याने शेतकऱ्यांनी बँक, महिला बचत गटाच्या माध्यमातून पैशांची तजवीज करताना दिसत आहेत. मात्र, बियाणे व किटकनाशकांच्या वाढलेल्या किमती, तर मजुरांचीही मजुरीदर दुपटीने वाढल्याने शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. त्यातच मजूरही मिळत नसल्याचे अडचण येत आहे.
केंद्रचालकांची डोकेदुखीकृषी विभागाच्या विविध योजनांतर्गत बियाणे वितरण, विक्री करण्यासाठी साथी पोर्टलचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. शासनाच्या वतीने विविध योजनातंर्गत अनुदानावर वितरित केल्या जाणाऱ्या बियाण्यांची नोंद साथी पोर्टलवर ठेवावी लागणार आहे. त्यामुळे अनुदानावर बियाणे वितरित करणाऱ्या उत्पादक संस्था, सहकारी संस्था, तसेच कृषी सेवा केंद्रचालकांची डोकेदुखी वाढली आहे.
बियाणे खरेदीतही फसगतमहागड्या व नामांकित कंपनीच्या बियाणे परवानाधारक कृषी केंद्रातून घेतल्यानंतरही उत्पादन निघाल्यावर आपली फसगत झाल्याची अनेक प्रकरणे उघडकीस येतात, तेव्हा शेतकऱ्यांना मनस्ताप शिवाय काहीही मिळत नाही. मागील वर्षी मूल तालुक्यात बियाण्यात फसगत झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती, हे विशेष.
"मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धानाला भाव मिळाला नाही, तर यावर्षी शासनाने बियाण्यांच्या किमती वाढविल्याने व मजुरांची मजुरीही वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे शेती परवडण्यासारखी राहिलेली नाही. मात्र, शेतकऱ्यांकडे शेती शिवाय दुसरा पर्याय नसल्याने शेती कसावी लागत असल्याचे चित्र आहे."- सूरज ठाकूर, युवा शेतकरी, भेजगाव