Ten lakhs of debt to cover the thirst of people | लोकांची तहान भागविण्यासाठी दहा लाखांचे कर्ज
लोकांची तहान भागविण्यासाठी दहा लाखांचे कर्ज

ठळक मुद्देसंडे अँकर । ध्येयवेडे मत्ते यांचे कार्य प्रेरणादायी

यशवंत घुमे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : कधीकाळी ज्या नाल्यावर आपण पाण्यातील खेळ खेळलो, हसलो, बागडलो आणि शेतातील गव्हाला ओलित केले. आपल्या मुक्या जनावरांना पाणी पाजून त्यांची तृष्णातृप्ती केली. बालपण रम्य करणारा तो बारमाही वाहणारा कोंढा नाला परिसरातील कोळसा खदानींमुळे आज निर्जल होऊन एखाद्या वाळवंटासमान झाला. तेथे औषधालाही पाणी उरले नसल्याने गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. ही खंत वयाची पासष्टी पार केलेल्या आयुध निर्माणी शस्त्र कारखान्यातून सेवानिवृत्त झालेल्या पुरुषोत्तम मत्ते यांच्या मनात आली. परंतु नेमके काय केले तर गावाचा हा पाणी प्रश्न सुटेल, याची दिशा त्यांना गवसत नव्हती. एके दिवशी भद्रावती येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिरपूर पॅटर्नचे प्रणेते सुरेश खानापूरकर यांचे ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ते ऐकायचा योग आला आणि त्यांच्या स्वप्नांना दिशा मिळाली.
सतत दोन वर्षे पाऊस पडला नाही तरी ग्रामस्थांची तहान भागविण्याची व शेत पिकांचे सिंचन भागविण्याची क्षमता त्यांनी उभारलेल्या छोटया छोटया बंधाºयात आहे. त्यामुळे पावसाळ्यातील पाणी जमिनीत मुरवून जमिनीचा जलस्तर उंचावण्यासाठी खानापूरकरांचा शिरपूर पॅटर्न महाराष्ट्रात सर्वपरिचित आहे. टंचाईग्रस्त भागातील गावखेडयांना आशेचा किरण दाखवणाºया त्यांच्या व्याख्यानाने मत्ते यांच्या स्वप्नांना दिशा मिळाली. त्यांनी सुरेश खानापूरकर यांच्यासोबत व्यक्तिगत सलगी वाढवून व सल्ला घेऊन शिरपूर पॅटर्नप्रमाणे आपल्या कोंढा गावी असलेल्या नाल्याचे खोलीकरण करण्याचा निर्धार मनाशी बांधला. यासाठी त्यांनी सर्वप्रथम गावकऱ्यांना विश्वासात घेतले. शासनाकडून काहीतरी मदत मिळेल, या अपेक्षेने चार वर्षे शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे उंबरठे झिजवले. परंतु शेवटपर्यंत यापैकी कोणीही त्यांच्या मदतीला धावले नाही. तरीही त्यांनी माघार घेतली नाही. आपल्या स्वप्नपूर्तीच्या आड सगळ्यांची येणारी शासकीय अनास्था बघून त्यांनी सेवानिवृत्तीनंतर वार्धक्यासाठी जन्मभर राखून ठेवलेल्या जमापूंजीच्या भरोशावर बॅकांकडून दहा लाख रुपयांचे कर्ज काढले. अन त्या रकमेतून गावकºयांसाठी कोंढा नाल्यावर बंधारा बांधण्याचे काम सुरू केले. जेसीबीच्या सहाय्याने रेतीचा उपसा करून खोलीकरण केले. सुरेश खानापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन ठिकाणी शंभर मीटर लांब, पस्तीस ते चाळीस फुट रूंद आणि वीस फुट खोल असे नाला खोलीकरणाचे काम पूर्ण केले आहे.

आजच्या स्वार्थी जगात माणूस पैशाच्या मागे धावत असताना एका सेवानिवृत्त कर्मचाºयाने केवळ गावकºयांच्या चेहºयावरील निखळ आनंद बघण्यासाठी निर्लेप भावनेने वार्धक्याच्या सुरक्षितेसाठी ठेवलेली जमापूंजी बॅकेकडे गहाण ठेवून सामाजिक दायित्व निभावले. याबद्दल ते निश्चितच कौतुकास पात्र आहे. समाजभावनेने प्रेरित होऊन या ध्येयवेड्याने केलेल्या अलौकिक कार्याने परिसरात ते आदर्श झाले असून प्रेरणादायी ठरले आहे. या कामात त्यांना त्यांची अर्धांगिनी शोभा यांनीही तितकीच भक्कम साथ देऊन आदर्श पत्नीधर्म निभावला, हे विशेष.


Web Title: Ten lakhs of debt to cover the thirst of people
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.