तेलंगणाची दारू, महाराष्ट्राचा पैसा

By Admin | Updated: May 15, 2016 00:39 IST2016-05-15T00:39:51+5:302016-05-15T00:39:51+5:30

राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी व बल्लारपूर तालुका तेलंगणा राज्यास लागून व दारू वाहतुकीस रेल्वे व राज्य मार्गाने सहज सोपे असल्यामुळे...

Telangana liquor, Maharashtra money | तेलंगणाची दारू, महाराष्ट्राचा पैसा

तेलंगणाची दारू, महाराष्ट्राचा पैसा

विक्रेत्यांच्या संख्येत वाढ : अंकुश लावण्यात पोलीस असमर्थ
राजुरा : राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी व बल्लारपूर तालुका तेलंगणा राज्यास लागून व दारू वाहतुकीस रेल्वे व राज्य मार्गाने सहज सोपे असल्यामुळे पुरवठा व विक्री जोमात सुरू आहे. त्यावर नियंत्रण देखरेख व कारवाई करणारे राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे पुरवठा व विक्रीच्या धंद्यात दररोज वाढ होत आहे. त्यामुळे शासनाच्या दारूबंदीचा आदेश निष्प्रभ झाला असल्याची चर्चा आम जनतेत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांच्या अथक प्रयत्न व संघर्षातून दारूबंदीचा निर्णय घेण्यास शासनास भाग पाडले. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणुकीच्या काळात दारूबंदी करण्यास पुढाकार घेण्याचे आश्वस्थ केले होते. त्यानुसार शासन दरबारी पाठपुरावा करून दारूबंदी केली. दारूबंदीमुळे दारू सम्राट हताश झाले. त्याच्या कमाईचे साधन बंद झाले. त्यामुळे संतप्त दारू सम्राटांनी बंदीचा निर्णय रद्द करण्यासाठी बरीच पायपीट केली. परंतु शासनाचा निर्णय हा जनतेच्या मागणीवर करण्यात आल्यामुळे मुठभर दारू सम्राटांच्या प्रयत्न असफल झाला. मात्र आता गावोगावी काही लोकांनी दारू विक्री अल्पवेळेत कमाईचे साधन बनल्यामुळे यात सहभागी होवून अवैध दारू विक्री जोरात सुरू आहे. तेलंगाणा राज्यातील परवानाधारक दुकान सिमेलगत असल्यामुळे व तेथील दारूचा दर फारच कमी असून मोठ्या प्रमाणात दारूची आयात करून पैसा कमाई होत असल्यामुळे हजारोच्या संख्येत दारू विक्रेते बनले आहे. यात नियमीत वाढ होत आहे.
महाराष्ट्र व तेलंगणा राज्य सिमेवर महाराष्ट्र पोलिसांची थातूरमातूर देखरेख सुरू आहे. दररोज चारचाकी, मोटार सायकल व रेल्वे मार्गाने शेकडो पेटी दारूची वाहतूक केली जात आहे. परंतु पोलिसांना दिसून येत नाही. बहुतेक गावात तेलंगणातील दारूच्या रिकाम्या बॉटल कुठून येतात, याचा शोध पोलीस घेत नाहीत. प्रत्येक गावात तंटामुक्ती समित्या आहेत. पोलीस पाटील व कोतवालसुद्धा आहेत.
दारू विक्रीचा व्यवसाय लपून छपून करणे अवघड आहे. ज्या घरातून किंवा दुकानातून दारू विक्री होते. तेथे लोकांची गर्दी असते. गर्दी असल्याचे कारण किंवा माहिती जाणून घेणे पोलीस पाटील व पोलीसांचे आहे. ही सर्व माहिती घेतली जाते. परंतु व्यवसाय बंद केला जात नाही. त्यात पुन्हा भर टाकली जाते. त्याला पाहून रिकामटेकडे सक्रीय होतात व दारूचा महापूर वाहतो.
पोलिसांनी आपल्या कर्तव्याची जाणिव ठेवून दारू विक्रीवर आळा घालण्याचे निश्चित केल्यास अवघ्या तीन दिवसांत गावातून दारू हद्दपार होवू शकते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यासाठी पोलिसांनी निर्धार करणे आवश्यक आहे. त्यांची मनस्थिती बनली पाहिजे. माझ्या बिटात, माझ्या ठाण्याच्या हद्दीतील गावात दारू विक्री करून देणार नाही असे ठरविल्यास गावातून दारू हद्दपार होईल. यासाठी कार्यरत पोलिसांनी पुढाकार घेतल्यास दारूबंदी यशस्वी होवू शकते.सध्या तेलंगणाची दारू व महाराष्ट्रातील जनतेचा पैसा असा व्यवसाय सुरू आहे. तेलंगणातील दारू परवानाधारक मालामाल होत आहे. दारूबंदीचा निर्णय तेलंगणा राज्यासाठी लाभदायक ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Telangana liquor, Maharashtra money