सीमावर्ती वादग्रस्त गावात तेलंगणाच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:25 IST2021-03-07T04:25:18+5:302021-03-07T04:25:18+5:30

योजनांचा घेतला आढावा : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी येत नसल्याची खंत संघरक्षित तावाडे जिवती : तालुक्यातील १४ गावे ही महाराष्ट्र आणि ...

Telangana District Collector visits disputed border village | सीमावर्ती वादग्रस्त गावात तेलंगणाच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट

सीमावर्ती वादग्रस्त गावात तेलंगणाच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट

योजनांचा घेतला आढावा : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी येत नसल्याची खंत

संघरक्षित तावाडे

जिवती : तालुक्यातील १४ गावे ही महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या वादात अडकली असून, याठिकाणी दोन्ही राज्यांच्या योजना सुरू असतात. महाराष्ट्र राज्याच्या योजना कमी, परंतु तेलंगणाच्या योजना जास्त प्रमाणात या गावात दिल्या जात असून त्या योजना येथे राबविल्या जातात की नाही यासाठी खुद्द तेलंगणाचे जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी या गावात येऊन भेटी दिल्या व योजनांचा आढावा घेतला.

मात्र चंद्रपूरचे जिल्हाधिकारी साधे या गावात पोहोचत नसल्याची खंत वादग्रस्त गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या कचाट्यात वादग्रस्त १४ गावे सापडले असून, याकडे महाराष्ट्र शासन दुर्लक्ष करीत असल्याचे गावकरी सांगतात. न्यायालयाने ही गावे महाराष्ट्राचीच असल्याचे सांगत असले तरी येथे तेलंगणा सरकार अनेक योजना राबवित आहे. कालच मुकदमगुडा आणि परमडोली या गावात तेलंगणा राज्याच्या आसिबाबाद येथील जिल्हाधिकारी राहुल राज यांनी आपल्या अधिकाऱ्यांसोबत भेटी देत योजना पूर्णत्वास आल्या की नाही हे जाणून घेतले. त्यात ग्रामपंचायतला दिलेला बगिचा, स्मशानभूमी आणि गांडूळ खतनिर्मिती शेड या योजना आहेत. तसेच महाराजगुडा ते मुकदमगुडा या रस्त्याचे अडलेले काम महाराष्ट्र राज्याचे होण्यासंदर्भात पाहणी केली.

महाराष्ट्र सरकार या गावांकडे नेहमीच दुर्लक्ष करत असल्याचे आणि तेलंगणा राज्याचा या वादग्रस्त गावांवर अधिकार नसताना तेथील अधिकारी या गावांना योजना देऊन अमलात आणत खुद्द भेटी देतात, ही शोकांतिका असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Telangana District Collector visits disputed border village