शिक्षणाच्या माहेरघरात शिक्षक दारोदार
By Admin | Updated: June 5, 2015 01:17 IST2015-06-05T01:17:53+5:302015-06-05T01:17:53+5:30
नुकताच १२ वी व १० वीच्या सीबीएसईचा निकाल लागला. जिल्ह्यात १२ वीत प्रथम नेहा सिंग या विद्यार्थिनीने व १० वीत प्रथमेश दहीकर याने प्रथम येऊन

शिक्षणाच्या माहेरघरात शिक्षक दारोदार
शिक्षकांच्या उन्हाळी सुट्या नावापुरत्या: कॉन्व्हेंटमध्ये प्रवेशासाठी प्रचंड गर्दी
ब्रह्मपुरी: नुकताच १२ वी व १० वीच्या सीबीएसईचा निकाल लागला. जिल्ह्यात १२ वीत प्रथम नेहा सिंग या विद्यार्थिनीने व १० वीत प्रथमेश दहीकर याने प्रथम येऊन ब्रह्मपुरी शिक्षणाचे माहेरघर आहे, हे सिद्ध करुन दाखविले आहे. परंतु दुसरीकडे शिक्षणाच्या माहेरघरातील शिक्षक प्रवेशासाठी दारोदार फिरत असल्याने विषमतेचे चित्र निर्माण झाले आहे.
तालुक्यात १२ वीचा निकाल समाधानकारक आहे. परंतु तालुक्यातील बहुतांश शाळा व महाविद्यालयात प्रवेशासाठी अजूनही फिरावे लागत असल्याने शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्यांवर पाणी फिरल्या गेले आहे. महाविद्यालयातील प्रवेशासाठी असे चित्र पूर्वी दिसत नव्हते. अलिकडे प्राध्यापकांनाही फिरावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचे भाव गगनाला भिडले आहे. शिक्षक दारोदारी जात असल्याने शिक्षकांप्रति विद्यार्थ्यांच्या मनात आदरभाव नसल्याचे अनेक शिक्षकांचे मत आहे. प्राचार्य उंटावरुन शेळ्या हाकण्यापलीकडे कुलरच्या बाहेर पडत नाही. परंतु शिक्षकांना प्रवेशासाठी बाहेर जाऊन फिरावेच लागेल, असा बडगा मानगुटीवर बसवला जात आहे. अनेक प्राचार्यांना शहरात किंवा गावखेड्यात पाहिले जात नाही.
केवळ त्या शिक्षकाच्या भरवश्यावर प्रवेश आणले जात असल्याने प्राचार्यपद शोभेचे बनले असल्याचे शिक्षकांकडूनच आता बोलले जात आहे. शिक्षक दारोदार फिरुनही त्यालाच प्रवेशासाठी दोषी ठरविण्याचीही भूमिका वरिष्ठाकडून ठरवून अपमानीत करण्याचाही प्रयत्न केला जात असल्याने शिक्षणाच्या माहेरघरात शिक्षकांची व्यवस्था ‘आयाराम गयाराम’ प्रकाराची बनलेली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी बहुतांश पालक कॉन्व्हेंटच्या प्रचंड रांगेत उभा राहून प्रवेश घेण्यासाठी धडपत असतात. पण दारावर आलेल्या शिक्षकाला प्रतिसाद न देता आल्यापावली अपमानित केले जाते.
अशी विषम स्थिती प्रवेशासाठी निर्माण झाली आहे. कॉन्व्हेंटच्या प्रवेश शुल्कावर कुठलेही निर्बंध नाही. मासिक फी दरवर्षी वाढविली जात आहे. तरीपण या लुटमार प्रकाराकडे श्क्षिणाधिकाऱ्यांचा कानाडोळा होत आहे.
दरवर्षी प्रवेश फी पाच हजाराच्या वरुन घेतली जात असल्याने मध्यवर्गीयाचे शिक्षणनगरीत आर्थिक कंबरडे मोडत आहे. (तालुका प्रतिनिधी)
‘ढ’ विद्यार्थ्यांवर गडांतर
शाळेत १०० टक्के निकाल लावण्याची स्पर्धा लागली असून कुमकुवत मुलांना निकाल लावण्याच्या नादात काढण्याचे फर्मानही शाळांकडून काढले जात असल्याने शिक्षणाच्या माहेरघरात विद्यार्थ्यांची ही दशा घडून येत आहे. यावरही कोणाचेही निर्बंध नाही. शाळेत शिक्षकांकडून अनेक कामे करवून घेतली जात असते. परंतु पगार अल्प असल्याने शिक्षणाचा स्तर खालावला जात असतो. अनेक खाजगी शाळेत श्क्षिकांचे आर्थिक शोषणही होताना दिसून येत आहे. शहरात अनेक खाजगी वर्ग सुरु आहेत. तेथेही नियमित शिक्षक संगनमताने शिकवणी वर्ग सुरु ठेवून अमाप पैसा लाटत आहेत तर दुसरीकडे बेरोजगार अल्पशा पगारावर काम करीत असल्याने त्यांचे आर्थिक शोषण होताना दिसून येत आहे. शिक्षणाच्या माहेरघरात विद्यार्थ्यांच्या भरवश्यावर यश संपादन करुन शाळेचा नाव मोठा करण्यासाठी हा प्रकार सुरु झाला आहे. शिक्षण विभाग मात्र याकडे अजिबात दुर्लक्ष करीत आहे. शिक्षणात अग्रेसर असलेली नगरी पैशाच्या जोरावर समोर जात असली तरी शिक्षकाची स्थिती मात्र केविलवाणी आहे.