जिल्ह्यात साडेअकरा हजार सिंचन विहिरींचा लक्ष्यांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 22:46 IST2019-02-09T22:46:08+5:302019-02-09T22:46:35+5:30
जिल्ह्याच्या भुगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे कृषीपंप नसलेल्या शेतकऱ्यांना सिंचन विहिरींशिवाय अन्य पर्याय उरला नाही. मात्र, लक्षांक कमी असल्याने शेकडो शेतकरी वंचित राहत आहेत. दरम्यान, नियोजन विभागाने (रोहयो) जिल्ह्यासाठी १ हजार ७०० विहिरींचा लक्षांक वाढवून दिल्याने सुमारे ११ हजार ५०० झाला आहे. २० जून २०२० पर्यंत योजनेला मुदतवाढ देण्यात आली.

जिल्ह्यात साडेअकरा हजार सिंचन विहिरींचा लक्ष्यांक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्याच्या भुगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे कृषीपंप नसलेल्या शेतकऱ्यांना सिंचन विहिरींशिवाय अन्य पर्याय उरला नाही. मात्र, लक्षांक कमी असल्याने शेकडो शेतकरी वंचित राहत आहेत. दरम्यान, नियोजन विभागाने (रोहयो) जिल्ह्यासाठी १ हजार ७०० विहिरींचा लक्षांक वाढवून दिल्याने सुमारे ११ हजार ५०० झाला आहे. २० जून २०२० पर्यंत योजनेला मुदतवाढ देण्यात आली.
सिंचन विहिर धडक कार्यक्रम अंतर्गत विविध निकषांची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना विहिरींचा लाभ दिला जातो. ही योजना दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे. ११ सप्टेंबर २०१६ रोजी योजनेची सुरूवात झाली. जिल्ह्यातील सिंचनाची व्याप्ती कमी असल्याने अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पुढे येत आहे. मात्र, जिल्ह्याचे लक्षांक व शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली. जिल्हा परिषद जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या विविध योजनेअंतर्गत विहिरींचा लाभ घेत असताना शेकडो शेतकºयांना अडचणी येत होत्या. परिणामी, योजनेविरूद्ध शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. यावर पर्याय म्हणून नियोजन विभागाने जिल्ह्याच्या लक्षांकामध्ये १ हजार ७०० विहिरींनी वाढ केली. हे लक्षांक दोन टप्प्यामध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.
अधिकाऱ्यांच्या उदासीनतेचा फटका
शेतकऱ्यांच्या हितासाठी सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम २०१६ पासून राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील १८ तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देताना अधिकाऱ्यांच्या उदासिनतेचा फटका बसतो. काही अधिकारी कागदीघोडे नाचविण्यातच वेळ घालवितात. अंमलबजाणीत त्रुटी राहात असल्याने विविध कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही.
टंचाईच्या झळा
शेतातील विहिरींमधील पाण्याची पातळी खालावल्याने रबी पिक घेणारे शेतकरी सध्या हैराण झाले आहेत. विहिरींवरील कृषीपंप अर्धा ते एक तास चालविल्यानंतर पाण्याची पातळी पूर्ण कमी होते. पूढील महिन्यात ही समस्या आणखी तीव्र होण्याची स्थिती जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यामुळे लक्षांक मंजूर करणे पूरेसे नाही तर सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम प्रामाणिकपणे राबविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.