सातबारा घ्या आॅनलाईन
By Admin | Updated: August 1, 2014 00:12 IST2014-08-01T00:12:15+5:302014-08-01T00:12:15+5:30
जिल्ह्यातील नागरिकांना आॅनलाईन सातबारा देण्याच्या योजनेला उद्या १ आॅगस्टपासून कोरपना तालुक्यातून प्रारंभ होत आहे. येत्या तीन महिन्यात संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना संगणकीकृत सातबारा

सातबारा घ्या आॅनलाईन
आज कोरपनातून प्रारंभ : तीन महिन्यांत जिल्हाभर
चंद्रपूर : जिल्ह्यातील नागरिकांना आॅनलाईन सातबारा देण्याच्या योजनेला उद्या १ आॅगस्टपासून कोरपना तालुक्यातून प्रारंभ होत आहे. येत्या तीन महिन्यात संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना संगणकीकृत सातबारा देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची योजना आहे.
जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकरण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील पंधराही तालुक्यातील पाच लाख १० हजार ६४१ सातबाराचे संगणकीकरण करण्याचे काम तीन महिन्यात केले जाईल. आॅनलाईन सातबारा या योजनेचा प्रारंभ १ आॅगस्ट रोजी कोरपना तालुक्यापासून करण्यात येणार आहे. यानिमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यातील सामूहिक व वैयक्तिक वनहक्क दावे प्रदान करण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात यापूर्वी तीन हजार ८१ वैयक्तिक वनहक्क वाटप करण्यात आले. त्यापैकी १७१५ व्यक्तींना सातबारा देण्यात आले. या कार्यक्रमात २६८ सातबारा वाटप करण्यात येणार असून उर्वरित वनहक्क दावे तीन महिन्यात वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
आॅनलाईन कामकाजासाठी जिल्ह्यातील १२८ तलाठ्यांना लॅपटॉपचा पुरवठा केला असून उर्वरित लॅपटॉप लवकरच वितरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भूमिधारी ते भूमिस्वामी करण्यासाठी विशेष मोहीम राबविल्याचे सांगून ६० हजार भूमिधारीचे भूमिस्वामीमध्ये रुपांतर करण्यात आले असून १ आॅगस्टच्या कार्यक्रमामध्ये ५०० भूमीस्वामीधारकांना सातबारा वाटप करण्यात येणार आहेत.
महसूल दिनाच्या निमित्ताने महाआॅनलाईनमार्फत अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, वय व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, नॉनक्रिमीलियर, शिधापत्रीका, अल्पभूधारक प्रमाणपत्र, सातबारा व आठ (अ) अशा दहा सेवा नागरिकांना देण्यात येणार आहेत. महसूल अभिलेख्यांचे डिजीटायजेशन करण्यासाठी १ आॅगस्टपासून जिल्ह्यात स्कॅनिंग सुरु करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात पाच तालुक्यांचा समावेश आहे. या ठिकाणी तीन महिन्यात अभिलेख्यांचे डिजीटायजेशन होईल.
उर्वरित १० तालुक्यातील काम टप्प्याटप्याने येत्या काही दिवसात करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सी. एस. डहाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे व अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)