प्रकल्पग्रस्तांचे गुन्हे मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:23 IST2021-01-14T04:23:44+5:302021-01-14T04:23:44+5:30
प्रतिभा धानोरकर : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी चंद्रपूर : येथील महाऔष्णिक वीज केंद्रातील सात प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी ...

प्रकल्पग्रस्तांचे गुन्हे मागे घ्या
प्रतिभा धानोरकर : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी
चंद्रपूर : येथील महाऔष्णिक वीज केंद्रातील सात प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी त्यांच्या मागण्यांसाठी ५ ऑगस्ट २०२० रोजी संच ८ आणि ९ च्या चिमणीवर चढले होते. त्यांच्या या आंदोलनानंतर दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे ३८ प्रकल्पग्रस्तांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्या प्रकल्पग्रस्तांवर कारवाई झाल्यास त्यांना नोकरी मिळण्यासह अनेक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यावरील गुन्हे मागे घेऊन त्यांना न्याय देण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदनही दिले आहे.
१९८४ ते १०९० या काळात शेतकरी कुटुंबाच्या शेतजमिनी वीज केंद्राने अधिग्रहित केल्या. त्यावेळी त्यांना योग्य मोबदला व नोकऱ्या द्यायला पाहिजे होत्या. मात्र, ३० ते ३५ वर्षे लोटल्यानंतरही सुमारे ७१० प्रकल्पग्रस्त शेतकरी नोकरीपासून वंचित आहेत, ही गंभीर बाब आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील पदभरतीत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना पूर्ण संधी व प्राधान्य द्यावे. यासह अन्य मागण्यांना घेऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सात प्रकल्पग्रस्त चिमणीवर चढले होते. यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देखील या प्रश्नांची दखल घेतली. पोलीस विभागाने या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तां मध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. यासंदर्भात आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे.