जैविक कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:28 IST2021-04-21T04:28:11+5:302021-04-21T04:28:11+5:30
प्रहार संघटनेची मागणी विसापूर : बऱ्याच दिवसांपासून विसापूरमधील वाॅर्ड क्रमांक १ मध्ये बल्लारपूर-नांदगाव रोडजवळील पूरबुडी भागात अज्ञात व्यक्तीकडून जैविक ...

जैविक कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा
प्रहार संघटनेची मागणी
विसापूर : बऱ्याच दिवसांपासून विसापूरमधील वाॅर्ड क्रमांक १ मध्ये बल्लारपूर-नांदगाव रोडजवळील पूरबुडी भागात अज्ञात व्यक्तीकडून जैविक कचरा तसेच एक्सपायर इंजेक्शन, औषधी उघड्यावर टाकण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात वावरणाऱ्या नागरिकांना, पाळीव प्राणी व गुरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा कचरा ग्राम प्रशासनाने उचलून त्याची विल्हेवाट लावावी व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते प्रीतम पाटणकर यांनी केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामध्ये असा जैविक कचरा उघड्यावर टाकल्याने लोकांच्या जिवांना धोका होऊ शकतो. रुग्णालयातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आरोग्य विभागाची काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्याप्रमाणेच तो नष्ट केला पाहिजे. परंतु गावातील काही खासगी रुग्णालये अशाप्रकारे बेजबाबदारपणे उघड्यावर कचरा टाकत आहेत. बाजूला शेती असल्याने जनावरे तिथे फिरत असतात. या कचऱ्यामध्ये इंजेक्शन असल्याने ते खाल्ल्याने त्यांना इजा होऊ शकते. शिवाय, लोकवस्ती असल्याने लहान मुलेही तिथे खेळतात. त्यांनासुद्धा इजा होऊ शकते, म्हणून तो कचरा उचलण्यात यावा व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.