‘त्या’ संचालकाच्या अपात्रतेला स्थगिती
By Admin | Updated: October 25, 2015 00:49 IST2015-10-25T00:49:55+5:302015-10-25T00:49:55+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीच्या १० मिनीटापूर्वी आर्थिक दुर्बल घटकातून निवडून आलेले रणवीर ठाकरे यांना जिल्हा निबंधक चंद्रपूर यांनी अपात्र ठरविल्याने ...

‘त्या’ संचालकाच्या अपात्रतेला स्थगिती
विभागीय सहनिबंधकांचे आदेश : बाजार समितीची निवडणूक पुन्हा होणार
ब्रह्मपुरी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीच्या १० मिनीटापूर्वी आर्थिक दुर्बल घटकातून निवडून आलेले रणवीर ठाकरे यांना जिल्हा निबंधक चंद्रपूर यांनी अपात्र ठरविल्याने निवडणुकीची प्रक्रिया एकतर्फी झाली होती. परंतु ‘त्या’ संचालकाने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नागपूर यांच्याकडे अपिल करुन अपात्रतेवर स्थगिती मिळविल्याने सभापती व उपसभापतीची निवडणूक पुन्हा नव्याने होण्याचे संकेत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदाची निवडणूक दीड महिन्यापूर्वी झाली होती. हाती आलेल्या निकालानुसार भैया- तिडके गटाचे नऊ व आमदार वडेट्टीवार समर्पित पॅनलला नऊ असे सारखे बलाबल मिळाले होते. त्यानंतर सभापती व उपसभापती पदाची निवडणूक १५ दिवसांपूर्वी घेण्यात आली होती. सारखे संचालक दोन्ही गटाकडे असल्याने निवडणूक ईश्वर चिठ्ठीने होईल, असे राजकीय संकेत वर्तविले जात होते. परंतु निवडणुकीच्या १० मिनिटापूर्वी जिल्हा निबंधक चंद्रपूर यांनी रणविर ठाकरे यांचे संचालकपद अपात्र असल्याचे पत्र हाती देताच भैया- तिडके गटाला हादरा बसला व सभापती, उपसभापती दोन्ही पद आमदार वडेट्टीवार यांच्या समर्पित पॅनलला मिळाले. त्यानंतर भैया- तिडके गटाने या निर्णयाच्या विरोधात विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नागपूर यांच्याकडे अपिल केले. त्यानुसार अर्ज कायदा कलम यू/आर ८८ एपिएमसी अंतर्गत आदेशाविरुद्ध स्थगिती देऊन रणविर ठाकरे यांच्या अपात्रतेला स्थगिती दिल्याने सभापती पदाची निवडणूक नव्याने घेण्याचे संकेत आहेत. (तालुका प्रतिनिधी)