बालकही देताहेत कष्टाळलेल्या कुटुंबाला आधार
By Admin | Updated: November 13, 2014 22:59 IST2014-11-13T22:59:29+5:302014-11-13T22:59:29+5:30
खरं म्हणजे हे वय खेळण्या- बागडण्याचे, आईच्या मांडीवर बसून काळ्या पाटीवर रेषा ओढण्याचे, शाळेत बाईच्या तालाला सुर देऊन पाठ्यपुस्तकातील गाणी घोळण्याच, आणि जमलंच तर आईचा

बालकही देताहेत कष्टाळलेल्या कुटुंबाला आधार
नितीन मुसळे - सास्ती
खरं म्हणजे हे वय खेळण्या- बागडण्याचे, आईच्या मांडीवर बसून काळ्या पाटीवर रेषा ओढण्याचे, शाळेत बाईच्या तालाला सुर देऊन पाठ्यपुस्तकातील गाणी घोळण्याच, आणि जमलंच तर आईचा पदर पकडून घरातली ईटुकली-मिटुकली कामे करण्याचे; पण या हक्काच्या प्राक्तनाला मुकलेली कित्येक छोटी-छोटी बालके आज ग्रामीण भागात आपल्या आई-वडिलांसोबत शेतात सुरू असलेल्या कापूस वेचणीला गुंतले असल्याचे दिसून येते. शेतमजुराअभावी हवालदिल झालेल्या आपल्या कुटुंबाकडे पाहून बालपणाला विसरून कित्येक बालके आपल्या या कष्टाळलेल्या कुटुंबाला आधार देताना दिसून येत आहेत.
आपल्या कृषीप्रधान देशात मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय केला जातो. परंतु सद्याच्या स्थितीला निसर्गाच्या अनियमिततेमुळे व शासकीय धोरणामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. पिकवायला गेले तर पिकत नाही. पिकलेच तर भाव मिळत नाही. अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे. या सर्व प्रकारात तर शेतमजुरांची कमतरता ही नविनच समस्या शेतकऱ्यांपुढे आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती या भागाला पांढऱ्या सोन्याची खाण समजली जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतल्या जाते. कपाशीच्या उत्पादनात शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडते. सुरूवातीपासूनच या पिकाची मोठी काळजी घ्यावी लागते. डवरणी, फवारणी, खत देणे, निंदन अशा विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज भासतेच. कापसाची वेचणीसाठी मात्र मजुरांची अत्यंत आवश्यकता असते. परंतु या भागात एकाच वेळी सर्वांच्या शेतात पांढरे सोने लखलखत असते. त्यामुळे त्याची वेचणी करण्याकरिता मजूरही मोठ्या प्रमाणात लागते.परंतु सध्या ते मिळणे कठीण झाले आहे.
मोठी मजुरी देऊनही मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी कुटुंबातील आबालवृद्धापासून बालकेही कापूस वेचणीच्या कामात गुंतल्याचे दिसून येत आहे.
ज्या वयात आपले आयुष्य फुलवायचे आहे, त्या वयात ही मुले आपल्या कुटुंबासोबत शेतीकामात गुंतली आहेत. आई-वडीलांच्या व आपल्या कुटुंबाचे होणारे काबाडकष्ट पाहून या बालकांचेही मन बालपणापासून दूर गेले आहे. आपल्या कुटुंबाला काही आधार व्हावा, या हेतूने ते शेतात कापूस वेचणीचे काम करीत आहेत.