न्याय न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: March 7, 2016 00:45 IST2016-03-07T00:45:22+5:302016-03-07T00:45:22+5:30
मागील ४० वर्षापासून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून शेती करणाऱ्या एका आदिवासी शेतकऱ्याला न्यायालयाच्या निर्णयानंतरही न्याय मिळाला नाही.

न्याय न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न
वरोरा : मागील ४० वर्षापासून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून शेती करणाऱ्या एका आदिवासी शेतकऱ्याला न्यायालयाच्या निर्णयानंतरही न्याय मिळाला नाही. महसूल विभागाचे उंबरठे झिजवून न्याय न मिळाल्याने त्याचा भ्रमनिराश झाला. परिणामी त्याने शनिवारी रेल्वेरुळावर आत्महत्येचा प्रयत्न केला. काँग्रेसचे शहराध्यक्ष छोटूभाई जैरुद्दीन यांना यासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी कार्यकर्त्यासह घटनास्थळ गाठून शेतकऱ्याला आत्महत्येपासून वाचविले.
वरोरा तालुक्यातील वडगाव येथील श्रावण अजाबराव मडावी हे १९७० पासून भूमापन क्र. ५४ वडगाव तलाठी साझा क्र. ५ मधील १.८७ हेक्टर शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून शेती करीत आहे. अशा जबरानजोत शेतकऱ्यांना पट्टे देण्यासंदर्भात २०१२ मध्ये शासनाने निर्णय घेतला. जमिनीचा पट्टा मिळावा म्हणून २००३ पासून त्यांचा लढा सुरू होता. मडावी यांना शासनाच्या निर्णयामुळे आधार मिळाला व जुलै २००३ रोजी न्यायालयाने मडावी यांच्या बाजूने निर्णय दिला.
यानंतर मडावी यांनी मार्च २००६ मध्ये अपील घेतली. यावर १७ सप्टेंबर २०१३ रोजी जिल्हासत्र न्यायाधीश वर्ग १ वरोरा यांनी आदेश पारित केले. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी याबाबत सकारात्मक धोरण अवलंबविले आणि वरोरा उपविभागीय अधिकाऱ्यांना कार्यवाहीसाठी पत्र दिले. परंतु यानंतरही श्रावण मडावी यांना न्याय मिळाला नाही.
२४ सप्टेंबर २०१५ रोजीच्या एका पत्रान्वये अंतिम निर्णय देताना मडावी यांच्या दाव्यात त्रुटी दाखवून वनहक्क समिती उपविभाग वरोरा तथा उपविभागीय वरोरा यांनी दावा फेटाळून लावला. यात दाखविलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी श्रावण मडावी यांनी अनेकदा तलाठी कार्यालय तसेच तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजविले. परंतु, संबंधित तलाठी व अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. परिणामी भ्रमनिरास झालेल्या श्रावण मडावी यांनी शनिवारी वरोरा येथील बोर्डा चौकाजवळील रेल्वेरूळावर दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच काही नागरिकांनी याची सूचना नगरसेवक छोटूभाई जैनुद्दीन यांना दिली. त्यानी लगेच कार्यकर्त्यांसह घटनास्थळ गाठून श्रावण मडावी यांनी आत्महत्येपासून वाचविले. (तालुका प्रतिनिधी)