सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला वनविभागाचा आढावा

By Admin | Updated: September 7, 2015 01:14 IST2015-09-07T01:14:44+5:302015-09-07T01:14:44+5:30

राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाच्या विविध विकास कामांचा गुरूवारी आढावा घेतला.

Sudhir Mungantiwar took a review of the forest department | सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला वनविभागाचा आढावा

सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला वनविभागाचा आढावा

चंद्रपूर : राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाच्या विविध विकास कामांचा गुरूवारी आढावा घेतला. चंद्रपूर, बल्लारपूर व मूल येथील खुल्या जागेवर वन विभागाने वृक्षारोपण करावे, अशा सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या. या बैठकीला वनविकास महामंडळाचे महाव्यवस्थापक एम.एम.गुल्ली, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, वन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक एस.एस.डोळे, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जे.पी. गरड, वनसंरक्षक गजेंद्र अहिरे, उपसंचालक नरवणे व वन अधिकारी उपस्थित होते.
सामाजिक वनीकरणाच्यावतीने वृक्षारोपण, जंगल क्षेत्रात बंधारे बांधणे, जलयुक्त शिवार, विश्राम गृह व निरीक्षण कुटी उभारणे, वनस्पती उद्यान प्रगती अहवाल, वन अकादमी, बांबु प्रशिक्षण केंद्र, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजना, लाभार्थ्यांना घरगुती गॅस वितरण, रोजगार निर्मिती कार्यक्रम, उत्तमराव पाटील वन योजना, बिबट सफारी, फुलपाखरु उद्यान, कॉफी टेबल बुक, रिक्त पदे व अधिकारी-कर्मचारी यांची निवासस्थान बांधकाम यासह इतर अनेक विषयाचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.
बल्लारपूर येथे असलेल्या वनविकास महामंडळाच्या भिंतीवर उत्तम छायाचित्र तसेच प्राण्यांची व वृक्षांची माहिती असलेले चित्र काढण्यात यावे अशा सूचना त्यांनी दिल्या. ताडोबाला जोडणारे रस्ते बनविण्याचा प्रस्ताव वन विभागाने तयार केला असून या रस्त्याची डिझाईन उत्तम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सोबतच रस्त्यावर साईनेज उभारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. चंद्रपूर, बल्लारपूर व मूल येथील मोकळया जागेवर आंबा, निंब या सारखे मोठे वृक्ष लावण्यात यावे, असे ते म्हणाले.
बांबू प्रशिक्षण केंद्रासाठी भविष्यात विविध प्रकारचे बांबू लागणार असून बांबूच्या नवीन प्रजातीची लागवड करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने २५० शाळांमध्ये हरित सेना स्थापन करण्यात आली असून याचा स्वतंत्र आढावा घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. वन विभागाला करावयाच्या विकास कामाचे वेळापत्रक तयार करुन वेळेत काम पूर्ण करावे असे निर्देश त्यांनी दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Sudhir Mungantiwar took a review of the forest department