Sudhir Mungantiwar honored with the Best Minister's Award | सुधीर मुनगंटीवार सर्वश्रेष्ठ मंत्री पुरस्काराने सन्मानित
सुधीर मुनगंटीवार सर्वश्रेष्ठ मंत्री पुरस्काराने सन्मानित

ठळक मुद्देउल्लेखनीय कार्याबद्दल दिल्लीत झाला गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देताना पाच लोककल्याणकारी अर्थसंकल्प, तीन वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीचा निर्धार अशा विविध कामांची दखल घेत महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना शनिवारी दिल्लीत सर्वश्रेष्ठ अनुभवी मंत्री म्हणून गौरविण्यात आले.
दिल्लीतील विज्ञान भवनात एका नियतकालिकातर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मुनगंटीवार म्हणाले, गेल्या ५ वर्षात केलेल्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतल्याबद्दल आनंद वाटला.
या पुरस्काराने पुन्हा नव्याने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. हा पुरस्कार आनंददायी तसेच प्रेरणादायी असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. ‘मन की बात’मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुनगंटीवार यांच्या वृक्ष लागवड अभियानाचे कौतुक केले होते.
यावेळी व्यासपीठावर केंद्रीय कौशल्य विकास मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे, एशियन ग्रुप चे संस्थापक एएएफटी विद्यापीठाचे कुलपती संदीप मारवा, फेम इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यू. एस. सौंथालिया, द फ्रंटचे संस्थापक राणा यशवंत, अहमदाबादचे खासदार डॉ. किरीट सोलंकी आदींची प्रामुख्याने उपस्थित होते.
एशिया पोस्ट सर्व्हे एजन्सीच्या मदतीने सर्वश्रेष्ठ मंत्री २०१९ या गौरवासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. व्यक्तिमत्त्व, प्रतिमा, कार्यक्षमता, प्रभाव, मंत्रालयीन विभागाच्या कामाकाजाची जाण, लोकप्रियता, दूरदृष्टी, कार्यशैली आणि परिणाम या सात मुद्यांच्या अनुषंगाने देशातील सर्व राज्यांच्या मंत्र्यांचा २१ विविध वर्गवारीत अभ्यास करण्यात आला होता, हे विशेष.

Web Title: Sudhir Mungantiwar honored with the Best Minister's Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.