गटशेतीतून कृषी विकासाचा प्रयोग यशस्वी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 22:41 IST2018-10-05T22:41:16+5:302018-10-05T22:41:51+5:30
गटशेतीतून कृषि विकास प्रयोग यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांचीच असून याकरिता संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आनंदवन येथे आयोजित जिल्हयातील गट शेती समूहांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात दिली आहे.

गटशेतीतून कृषी विकासाचा प्रयोग यशस्वी करा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गटशेतीतून कृषि विकास प्रयोग यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांचीच असून याकरिता संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आनंदवन येथे आयोजित जिल्हयातील गट शेती समूहांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात दिली आहे.
यावेळी डॉ. विकास आमटे, माजी आमदार संजय देवतळे, जि.प. सभापती अर्चना जीवतोडे, वरोरा प.स. सभापती रोहिणी देवतळे, राहुल सराफ, जि.प. सदस्य मारोती गायकवाड, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, नरेंद्र जीवतोडे, उपविभागीय अधिकारी (कृषि) राजवाडे, पाटील, गौतम करार, पोतदार, महारोगी सेवा समिती संचालक कडू यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
ना. अहीर पुढे म्हणाले, सबका साथ, सबका विकास ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा आहे. तर गटशेतीच्या माध्यमातून त्याला प्रतिसाद म्हणून समूह शेती, समूह विकास हा आहे. आपला देश कृषि प्रधान आहे, असे आपण म्हणत असलो तरी मागील सरकारच्या काळात अन्नधान्य आयात करावे लागत होते तर या सरकारच्या काळात अन्नधान्य निर्यात करू लागलो हे मोठे यश आहे. रस्ते विकासाकरिता सीआरएफ फंडप्रमाणे कृषि सिंचनाकरिता निधी उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी आपण मागील सरकारकडे केली होती. परंतु नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्याबरोबर पहिल्यांदा देशात प्रधानमंत्री कृषि सिंचनावर तरतू करण्यात आली आहे. याचा अर्थ हे सरकार कृषि पोषक सरकार आहे, हेच सिध्द होते. गटशेतीच्या माध्यमातून अन्नधान्य, प्रोसेसिंग व मार्केटींग हे सर्व उपक्रम राबविण्याची तरतूद असून शेतकरी गट शेती व्यापारात समोर आल्यास हे एक पुरोगामी पाऊल ठरेल. रसायनमुक्त अन्नधान्याची गरज जगात असून त्याकरिता जादा किंमत जग मोजण्यास तयार आहे व निर्यातीस मोठा वाव आहे. या संधीचा उपयोग शेतकऱ्यांनी करण्यासाठी गट शेती करणाऱ्या समुहानी समोर येण्याचे आवाहन ना. अहीर यांनी केले.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, सहनशील आहे म्हणूनच सरकारे टिकून आहेत, असे मत नोंदवून ना. अहीर म्हणाले की, यापुढे देशात पुल वजा बंधारे बांधण्याचे धोरण ना. नितीन गडकरी यांनी निश्चित केल्याने देशाची सिंचन क्षमता वाढणार आहे.
आनंदवन हे यापुढे शेती प्रयोगाची पंढरी होणार असून गट शेतीच्या शेतकरी समूहासाठी ते प्रेरणास्थान राहणार आहे. आनंदवन समूह गटशेती शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे समाधान असल्याचे मत ना. अहीर यांनी नोंदविले. या प्रशिक्षणात चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा व अमरावती येथून एकूण १३ गट उपस्थित होते. तर त्यांच्या माध्यमातून जवळपास तीनशे शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.