बोगस लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

By Admin | Updated: March 13, 2016 01:09 IST2016-03-13T01:09:21+5:302016-03-13T01:09:21+5:30

स्वछ भारत मिशन अंतर्गत २०१४-१५ मध्ये नांदा ग्रामपंचायतीच्या वतीने वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी १३२ लाभार्थ्यांना १२ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले.

Subsidy benefits to bogus beneficiaries | बोगस लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

बोगस लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

नांदा ग्रामपंचायतीचा प्रकार : माहिती अधिकारातून बाब उघडकीस
गडचांदूर : स्वछ भारत मिशन अंतर्गत २०१४-१५ मध्ये नांदा ग्रामपंचायतीच्या वतीने वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी १३२ लाभार्थ्यांना १२ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. मात्र सदर लाभार्थ्यांमध्ये अनेक बोगस लाभार्थी असल्याचे आरटीआय कार्यकर्ते राजु काळे यांनी माहिती अधिकारातून मागितलेल्या माहितीतून समोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार ज्या लाभार्थ्यांनी ३-४ वर्षांपूर्वीच शौचालय बांधलेले आहे किंवा ज्यांना दारिद्र रेषेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे, अशा लोकांना ग्रामपंचायतीने लाभ दिला आहे. तर काही लोकांनी शौचालयाची दुरुस्ती करून लाभ घेतलेला आहे. एका व्यक्तीच्या तर तब्बल आडनावात बदल करून दोनदा लाभ दिल्याचे दिसून येते. यादीतील अनुक्रमांक २६ वर भगवान बापूराव दखरेश यांना लाभ दिला आहे तर १३० वर भगवान डाखरे यांना लाभ दिला आहे. पहिल्या नावातील आडनावात फेरबदल करून लाभ दिल्याचे यादीवरून निदर्शनास आले. हे दोन्ही व्यक्ती एकच आहे.
अनुक्रमांक ६१ वर सुमन इदे या महिलेला लाभ दिला आहे. या महिलेला दोन घरे आहेत. जुन्या राहत्या घरी शौचालय असताना नवीन घरासाठी शौचालय अनुदान दिले आहे. अनुक्रमांक १२१ वर लक्ष्मीबाई बत्तीनवार ही महिला आवारपूर येथे कायम वास्तव्यास असून त्यांचे स्वताचे घर आहेत. त्यामध्ये जुने शौचालय आहे. तरीसुद्धा नंदाफाटा येथील घराकरिता शौचालयाचे अनुदान दिले आहे. अनुक्रमांक १५, ६३, व १२४ या नागरिकांनी शासनाकडून बी.पी.एल. घरकुलाचा लाभ घेतला आहे. तरीसुद्धा त्यांना नांदा ग्रामपंचायतीने लाभ मिळवून दिल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. पात्रता सर्वेमध्ये नाव नसताना अनेक लाभार्थ्यांना शौचालयाचे अनुदान दिल्याचे निदर्शनास येते. सदर अनुदान देत असताना ग्रामपंचायतीची मंजुरी घ्यायला पाहिजे होती. मात्र तसे झाले नाही. तसेच पाचशे रुपयांवरील कितीही रक्कम देत असताना ती रेखांकित धनादेशाद्वारेच द्यावी लागते. परंतु ग्राम विस्तार अधिकारी सुरेश वाढई व सरपंच पूजा मडावी यांनी बेरर धनादेशाद्वारे रक्कम दिलेली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Subsidy benefits to bogus beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.