ओबीसी आरक्षणासाठी उपसमिती गठित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:01 IST2020-08-17T05:00:00+5:302020-08-17T05:01:06+5:30
कोरोना संक्रमणाचा सर्वोच्च कालावधी पुढे येऊ शकतो. अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये उपचारासाठी रुग्णालयात जागाच नाही, अशी स्थिती चंद्रपूरमध्ये होऊ नये यासाठी ३०० ते ४०० बेडच्या तात्पुरत्या स्वरूपातील कोविड हॉस्पिटलची निर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

ओबीसी आरक्षणासाठी उपसमिती गठित
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ओबीसींच्या आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण १९ टक्के करण्यासाठी राज्यस्तरावर उपसमिती गठीत करण्यात आल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
कोरोना संक्रमणाचा सर्वोच्च कालावधी पुढे येऊ शकतो. अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये उपचारासाठी रुग्णालयात जागाच नाही, अशी स्थिती चंद्रपूरमध्ये होऊ नये यासाठी ३०० ते ४०० बेडच्या तात्पुरत्या स्वरूपातील कोविड हॉस्पिटलची निर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण त्यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणेची आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता सुषमा साखरवाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. एस. मोरे उपस्थित होते.
आणीबाणीच्या प्रसंगांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडरची गरज भासू शकते. त्यामुळे चंद्रपूर शहरात आॅक्सिजन जनरेशन प्लांट सुरू करण्याची चाचपणी ही या बैठकीत करण्यात आली.
यासंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावा व तसेच आवश्यक असणारे तीनशे ते चारशे बेडचे रुग्णालय नव्याने निर्माण होत असलेले मेडिकल कॉलेज परिसर चांदा क्लब किंवा पोलीस ग्राउंड परिसर यापैकी कोणत्या ठिकाणी अधिक उपयुक्त राहील, या संदर्भातही सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निधी मिळेल व त्यासाठी त्यांचे प्रवेश अडणार नाही, याची काळजी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. खनिज विकास निधीतून ३५ रुग्णवाहिका व एक अंत्यविधीसाठीची वाहिका आरोग्य विभागाच्या दिमतीला लवकरच येणार असल्याचे ना. वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.