स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी परीक्षेच्या प्रतीक्षेत; अर्ज भरून दोन वर्षे उलटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:33 IST2021-08-18T04:33:30+5:302021-08-18T04:33:30+5:30

नांदा फाटा : राज्यातील पोलीस निरीक्षक विक्रीकर, निरीक्षक विक्रीकर अधिकारी या जागांसाठी २०१९ मध्ये शासनाने स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांकडून अर्ज ...

Students waiting for competitive exams; Two years have passed since the application was filed | स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी परीक्षेच्या प्रतीक्षेत; अर्ज भरून दोन वर्षे उलटले

स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी परीक्षेच्या प्रतीक्षेत; अर्ज भरून दोन वर्षे उलटले

नांदा फाटा : राज्यातील पोलीस निरीक्षक विक्रीकर, निरीक्षक विक्रीकर अधिकारी या जागांसाठी २०१९ मध्ये शासनाने स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांकडून अर्ज मागितले होते. जवळपास ८०६ जागांसाठी हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत; परंतु दोन वर्षे उलटूनही परीक्षा झालेली नाही.

येत्या ४ सप्टेंबर रोजी या पदांसाठीच्या परीक्षा होणार असल्याचे शासनामार्फत सांगण्यात येत आहे; परंतु याही परीक्षा होईल की नाही, त्या पुन्हा रद्द होतील. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीसाठी विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. अर्ज भरण्यासाठी विविध कागदपत्रे तयार करून अर्जाचे शुल्कही विद्यार्थ्यांनी भरले आहे; मात्र वारंवार परीक्षा रद्द करून शासन विद्यार्थ्यांची फसवणूक करीत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. या शासनाच्या तुघलकी धोरणामुळे विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून प्रतीक्षाच करावी लागत आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शहरात जाऊन स्पर्धा परीक्षा शिकवणी वर्गात अभ्यास करीत आहेत, तर कुठे गावागावात वाचनालयात गरीब विद्यार्थी परीक्षेची तयारी करताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले खरे; परंतु परीक्षाच होत नसल्याने स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही अनेक विद्यार्थ्यांनी विविध पदांसाठी अर्ज केलेला आहे. जीवती, राजुरा, गोंडपिपरी, चिमूर, नागभीड आधी ग्रामीण भागातील विद्यार्थी चंद्रपूर-नागपूर तसेच पुणे येथे जाऊन महागडे शिकवणीवर्ग लावून अभ्यास करीत आहे; मात्र परीक्षेबाबतची निश्चितता दिसून येत नसल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. शासनाने तत्काळ परीक्षा घ्यावी आणि ४ सप्टेंबर रोजी सदर जागांबाबतची परीक्षा निश्चित करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

Web Title: Students waiting for competitive exams; Two years have passed since the application was filed