विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:50 IST2021-02-06T04:50:53+5:302021-02-06T04:50:53+5:30
चंद्रपूर : राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात यावर्षी सामाईक प्रवेश प्रक्रियेच्या फक्त दोन फेऱ्या झाल्या. कोरोनाचा प्रतिकूल परिणाम अभियांत्रिकीच्या प्रथम व ...

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ द्यावा
चंद्रपूर : राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात यावर्षी सामाईक प्रवेश प्रक्रियेच्या फक्त दोन फेऱ्या झाल्या. कोरोनाचा प्रतिकूल परिणाम अभियांत्रिकीच्या प्रथम व द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेवरही झाला. प्रवासाची अडचण, प्रक्रियेच्या तारखांची नेमकी माहिती उपलब्ध नसणे आदी कारणांमुळे ग्रामीण भागातील बरेच विद्यार्थी वंचित राहिले. त्यामुळे शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ देण्याची मागणी जिल्हा विद्यार्थी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.
राज्य शासनाने मार्च २०२० मध्ये काढलेल्या एका परिपत्रकानुसार सत्र २०२०-२१ मध्ये जे विद्यार्थी सामाईक प्रवेश प्रक्रियेव्यतिरिक्त किंवा नंतर प्रवेश घेतील, त्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती वा शिष्यवृत्ती मिळणार नाही, असे जाहीर केले. हा निर्णय अन्यायकारक ठरणार आहे. चंद्रपूरसारख्या ग्रामीण व आदिवासीबहुल जिल्ह्यात मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. दोन फेऱ्यांनंतर हे विद्यार्थी प्रवेशापासून दूर राहिले. अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त आहेतच. कोरोनामुळे सर्व पातळ्यांवर निर्माण झालेल्या अडचणी बघता हे विद्यार्थी शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती वा शिष्यवृत्ती न घेता अभियांत्रिकी शिक्षण घेणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास, उन्नत गटातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती वा शिष्यवृत्ती देण्याची मागणी जिल्हा विद्यार्थी काँग्रेसने केली. यावेळी जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय, कृष्णा रेड्डी, रक्षित अन्नालकर, प्रणय साठे, शंतनू सातपुते, गोविंदा अमृतकर उपस्थित होते.