विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकात आता श्रेणीऐवजी वर्गोन्नत असा राहणार उल्लेख - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:46 IST2021-05-05T04:46:29+5:302021-05-05T04:46:29+5:30
चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, विद्यार्थ्यांचेही मोठे शैक्षणिक नुकसान झाले. यावर उपाय म्हणून ऑनलाईन वर्ग ...

विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकात आता श्रेणीऐवजी वर्गोन्नत असा राहणार उल्लेख - A
चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, विद्यार्थ्यांचेही मोठे शैक्षणिक नुकसान झाले. यावर उपाय म्हणून ऑनलाईन वर्ग घेण्यात आले. मात्र, ग्रामीण भागात फारसा प्रतिसाद बघायला मिळाला नाही. त्यातच प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना तर ऑनलाईन तसेच ऑफलाईन कसे शिकवायचे, असा प्रश्न कायम होता. यामध्येच शैक्षणिक वर्षही संपले. त्यामुळे वर्षभर शाळेत न जाताच विद्यार्थी यावर्षी पास झाले असून, पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर यावर्षी पहिल्यांदाच श्रेणी ऐवजी वर्गोन्नत असा उल्लेख राहणार आहे.
मागील वर्षभरापासून कोरोनाने तोंड वर काढले आहे. प्रादुर्भाव टाळण्यासाठी पहिली ते चौथीचे वर्षभरात एकही दिवस वर्ग भरले नाही. नाही म्हणायला २७ जानेवारीपासून ५वी ते ८वीचे वर्ग भरले. मात्र, ते काही दिवसांतच बंद पडले. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश कसा द्यायचा, प्रगतिपुस्तकामध्ये नेमके काय नमूद करायचे, आदी प्रश्न शिक्षकांपुढे होते. वर्षभर विद्यार्थी शाळेत गेले नाही, होमवर्क नाही किंवा इतर ॲक्टिव्हिटी नाही. दरवर्षी शैक्षणिक वर्ग संपल्यानंतर दिल्या जाणाऱ्या प्रगतिपत्रकात विविध बाबींची नोंद होत होती. यामध्ये प्रत्येक विषयानुसार मूल्यमापन, विद्यार्थ्यांचे वजन, उंची, कार्यानुभव, कला, आदींचे गुण असायचे. मात्र, यावर्षी शाळाच सुरू झाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकामध्ये कोरोना १९ या साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशान्वये आरटीई ॲक्ट २००९ कलम १६ नुसार सदर विद्यार्थ्यांस पुढील वर्गात वर्गोन्नत करण्यात आले आहे, असे नमूद करण्यात येणार आहे. त्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकात पासऐवजी वर्गोन्नत असा उल्लेख बघायला मिळणार आहे.
बाॅक्स
यावर्षी पहिल्यांदाच नसणार या नोंदी
दरवर्षी विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकामध्ये शाळेचे दिवस, उपस्थिती दिवस, विद्यार्थ्याची उंची, वजन तसेच विषयानुसार श्रेणी दिली जात होती. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच या सर्व गोष्टी प्रगतिपुस्तकात नमूद राहणार नाही.
बाॅक्स
विद्यार्थी मित्र पुस्तकाचा करावा लागणार वापर
यावर्षी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यपापन झाले नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात या विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्र या पुस्तकाचा आधार घ्यावा लागणार असून, शिक्षकांना पुढील शैक्षणिक वर्षामध्ये शिकवावे लागणार आहे.
बाॅक्स
असे आहे विद्यार्थी
पहिली - २८८२४
दुसरी - ३१२७२
तिसरी - ३१७८४
चौथी - ३३७१९