स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी घडावा
By Admin | Updated: September 6, 2014 01:46 IST2014-09-06T01:46:27+5:302014-09-06T01:46:27+5:30
प्रत्येकाचे आयुष्य घडविण्यात शिक्षकाची भूमिका महत्वाची असते. एखाद्यावेळेस अधिकाऱ्यांची चूक आपण समजू शकतो.

स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी घडावा
चंद्रपूर : प्रत्येकाचे आयुष्य घडविण्यात शिक्षकाची भूमिका महत्वाची असते. एखाद्यावेळेस अधिकाऱ्यांची चूक आपण समजू शकतो. मात्र, शिक्षक चुकला तर संपूर्ण पिढीचे नुकसान होते. सध्या स्पर्धा परीक्षेचे युग आहे. ग्रामीण भागातील शिक्षकांनी या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना घडवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.
शैक्षणिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यात उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांचा जिल्हा परिषदेतील कन्नमवार सभागृहात शिक्षक दिनी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुंभरे होते. याप्रसंगी उपाध्यक्ष संदीप गड्डमवार, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलिल, सभापती अरुण निमजे, ब्रिजभूषण पाझारे, शांताराम चौखे, पार्वता गभणे, संतोष कुंटावार, सभापती हर्षा चांदेकर, सिंधू बारासिंगे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत गुरू यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आदर्श या शब्दाला जपणे व त्याविषयी जागरूक असणे आवश्यक आहे. अनेकांना शिक्षकांनीच घडविले आहेत. त्यांच्याकडून असेच कार्य घडत राहो, असे सांगत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी नावीन्यपूर्ण उपक्रमातून बायामेट्रीक मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
जिल्ह्यात अनेक शिक्षक आहेत. त्यांच्या हातून चांगले कार्य घडते. मात्र, ते पुरस्कारासाठी अर्ज करीत नाही. पुढीलवर्षी अशा शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशूतोष सलील यांनी सांगितले. त्यानंतर सरोज प्रकाश चांदेकर, भाऊराव ऋषीजी कावळे, श्रावण रामभाऊ गुंडेट्टीवार, घनश्याम बापूजी पाचभाई, कनिराम गोमाजी पवार, हरीश चंद्रभान ससनकर, बबिता नानाजी बोबडे, शुद्धोधन रूमाजी मेश्राम, पंडित रामाजी लोंढे, खुशाल दादाजी पिसे, टिकाराम आत्माराम शेंडे, वामन श्याम साळवे, जीमनादास दादाजी मसराम, निता ओंकार निनावे, बंडू लिलाधर चरपे या १५ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत पळसगाव, पारडगाव, नंदोरी येथील जिल्हा परिषद शाळांना सन्मानीत करण्यात आले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथ.) रविकांत देशपांडे यांनी तर आभार उपशिक्षणाधिकारी टेंभुर्णे यांनी मानले. यावेळी शिक्षक व जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)