लोखंडी गेट पडून विद्यार्थी जखमी

By Admin | Updated: August 13, 2015 01:46 IST2015-08-13T01:46:09+5:302015-08-13T01:46:09+5:30

लोखंडी गेट पडून विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शहरातील गांधीनगर प्रभागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. ५ मध्ये घडली.

Student injured by iron gate | लोखंडी गेट पडून विद्यार्थी जखमी

लोखंडी गेट पडून विद्यार्थी जखमी

अनागोंदी कारभार : ब्रह्मपुरीच्या जिल्हा परिषद शाळेतील घटना
ब्रह्मपुरी : लोखंडी गेट पडून विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शहरातील गांधीनगर प्रभागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. ५ मध्ये घडली. सोहम जितेंद्र मेश्राम असे जखमी विद्यार्थ्याचे नाव असून तो इयत्ता चवथीत आहे. त्यांच्यावर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे.
लोखंडी गेटचे बांधकाम एक महिन्यापूर्वीच करण्यात आले होते. मात्र गेटचे थातूरमातूर काम केल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्याला सोसावा लागत आहे. शाळा प्रशासन व वॉर्डवासी यांच्यात अजूनही खटके उडत असताना शाळेत मुलांना गणवेष वाटप करण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सोहम जितेंद्र मेश्राम हा चौथ्या वर्गात शिकणारा विद्यार्थी गेट मधून जात असताना अचानक गेट त्याच्या अंगावर कोसळला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
या घटनेने पुन्हा एकदा शाळेची कथा व गाथा उजेडात आली आहे. यापूर्वी ही शाळा बागेच्या प्रकरणावरून वॉर्डातील नागरिक, शाळा व्यवस्थापन तसेच शिक्षक यांच्यातील वाद गाजला होता. या प्रकरणाची लेखी तक्रार वॉर्डातील नागरिकांनी संबंधित विभागाला केली होती. परंतु, अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी याला केराची टोपली दाखवून शिक्षकांना अभय दिले असल्याचा आरोप वॉर्डवासियांचा आहे.
शाळेचे अनेक प्रकरण गाजत असून प्रशासन कार्यवाही का करीत नाही, असा वार्डवासीयांचा रोष आहे.
शाळेच्या विकासाऐवजी मनात येईल तसे सोयीचे काम करणे, वागणे, पालकांना व वार्डवासीयांना विचारात न घेणे आदी प्रकारामुळे शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता खालावत चालली आहे. याबाबत गंभीर दखल घेऊन संबंधितावर योग्य कार्यवाही करावी अशी वार्डवासीयांकडून मागणी होत आहे. याची शिक्षण विभागाने दखल घ्यावी. (प्रतिनिधी)

Web Title: Student injured by iron gate