वादळाने ३९५ वीज खांब कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2016 00:42 IST2016-05-08T00:42:08+5:302016-05-08T00:42:08+5:30

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात चक्रीवादळासह अवकाळी पाऊस सुरू आहे.

The storm damaged 395 lightning pillars | वादळाने ३९५ वीज खांब कोसळले

वादळाने ३९५ वीज खांब कोसळले

चक्रीवादळाचा फटका : महावितरण कंपनीचे २० लाखांचे नुकसान
चंद्रपूर : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात चक्रीवादळासह अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचे नुकसान झाले असून या वादळाचा सर्वाधिक फटका महावितरण कंपनीला बसला आहे. चक्रीवादळाने चंद्रपूर, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, वरोरा या चार विभागात उच्च दाब व लघु दाबाचे तब्बल ३९५ वीज खांब कोसळले. त्यामुळे अंदाजे २० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती महाविरण कंपनीने दिली आहे.
यावर्षीच्या सुरूवातीपासूनच अवकाळी पाऊस सुरू आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने रबी पिकांना फटका बसला होता. तर एप्रिल व आता मे महिन्यातही अवकाळी पाऊस सुरूच आहे. चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर अनेकांच्या घरांचे छप्परे उडाली. त्यामुळे अनेक नागरिकांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
महावितरण कंपनीच्या चंद्रपूर विभागात उच्च दाबाचे ३५ खांब, लघु दाबाचे ८५ खांब कोसळले तर ९ वीज वाहिन्यांच्या तारा तुटल्या. बल्लारपूर विभागात उच्च दाबाचे २७, लघु दाबाचे ९५ तर १२ वीज वाहिन्यांचे तारा तुटले. वरोरा विभागात उच्च दाबाचे १० खांब व लघु दाबाचे १०१ खांब कोसळले. तर २ रोहित्रांचे नुकसान झाले.
ब्रह्मपुरी विभागात लघु दाबाचे ४२ वीज खांब कोसळले तर ६ रोहित्रांचे नुकसान झाले आहे. यात अंदाजे २० लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. वादळामुळे अनेक गावातील वीज पुरवठा खंडीत झाला असून काही गावातील वीज पुरवठा अद्यापही सुरू झालेला नाही. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The storm damaged 395 lightning pillars