भाजीबाजारातील कचऱ्यामुळे दुर्गंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST2021-02-05T07:40:23+5:302021-02-05T07:40:23+5:30
भद्रावती तालुक्यात अवैधरित्या प्रवासी वाहतूक जोरात भद्रावती : तालुक्याला जोडणाऱ्या विविध मार्गांवर मागील काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूक सुरू ...

भाजीबाजारातील कचऱ्यामुळे दुर्गंधी
भद्रावती तालुक्यात अवैधरित्या प्रवासी वाहतूक जोरात
भद्रावती : तालुक्याला जोडणाऱ्या विविध मार्गांवर मागील काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे दररोज किरकोळ अपघात होत आहेत. या मार्गांवरील वृक्षांवर रेडियम पट्टी नाही. मात्र, प्रवाशांची काळजी न घेता चालक मनमर्जीने वाहन दामटवतात. त्यामुळे या रस्त्यांवरील अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्याची मागणी केली जात आहे.
गडचांदूर - पांढरकवडा बसअभावी प्रवाशांची ताटकळ
गडचांदूर : येथून कोरपना, आदिलाबादमार्गे पांढरकवडा शहरासाठी थेट बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. गडचांदूर हे शहर सिमेंट उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथून अनेक भागात जाण्यासाठी बससेवा आहे. मात्र, पांढरकवडासाठी थेट बससेवा नाही. तसेच आदिलाबाद हा कमी अंतराचा मार्ग असल्याने या मार्गावर बस सेवा सुरू करणे गरजेचे आहे.
तालुका सीमा फलक नसल्याने संभ्रम
चिमूर : जिल्ह्यातील एकाही तालुक्याच्या सीमेवर तालुका सीमा स्वागत फलक नाही. त्यामुळे कोणता तालुका कुठून सुरू होतो. याबाबत नवीन व्यक्ती संभ्रमात पडते. या सीमांवर सीमा स्वागत फलक लावल्यास सीमाही सुशोभित दिसेल. तसेच या माध्यमातून शहरांच्या अंतराची माहितीही मिळेल. त्यामुळे बांधकाम विभागाने प्रत्येक तालुका सीमेवर सीमा स्वागत फलक लावावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
माणिकगड परिसराचा इतिहास उपेक्षित
जिवती : राजुरा, जिवती, कोरपना तालुक्यात असलेला माणिकगड पहाड हौशी ट्रेकर्ससाठी अद्भूत पर्वणी ठरत आहे. जिल्ह्यातील सात बहिणींचा डोंगर पहाडाचा विकास साधल्यास पर्यटनदृष्ट्या विकासाला चालना मिळू शकते. मात्र, शासनाच्या दुर्लक्षामुळे माणिकगड परिसराचा इतिहास अजूनही उपेक्षित आहे.
पीक विमासाठी माहिती केंद्र सुरू करा
चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरपना, जिवती, गोंडपिपरी, पोंभुर्णा, घुग्घुस, कोठारी, विसापूर, भिसी, तळोधी, बाळापूर येथील पीक विम्याची अनेक प्रकरणी प्रलंबित आहेत. मोबदला अजूनही मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत. माहितीच मिळत नसल्याने तालुकास्थळी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
ठाण्यातील वाहनांचा लिलाव रखडला
चंद्रपूर : येथील शहर व रामनगर पोलीस ठाण्यात अनेक दुचाकी वाहने जप्त करून आणण्यात आली आहेत. मात्र, वाहनमालकांनी ही वाहने अनेक वर्षांपासून नेलीच नाहीत. आता ती पोलीस ठाण्यात पडून आहेत. त्यातील अनेक वाहने भंगार झाली. काहींचे सुटे भागही बेपत्ता आहेत. या वाहनांचा लिलाव केल्यास शासनाच्या महसुलात भर पडू शकते. दरवर्षी न्यायालयाच्या आदेशाने या वाहनांचा लिलाव होतो. मात्र, अजूनही लिलाव करण्यात आला नाही.
जिल्ह्यातील शिवभोजनाचे केंद्र वाढावे
चंद्रपूर : शासनाने शिवभोजन केंद्र सुरू केली आहेत. मात्र, त्याच्यातील थाळींची संख्या मोजकीच ठेवली आहे. शिवाय केंद्रांची संख्या कमी आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात रांग लागते.
प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालावी
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, वाहनांद्वारे प्रदूषणात वाढ होत असून, प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे.
बचत गटांना कर्जपुरवठा करण्याची मागणी
राजुरा : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात परिणाम झाला आहे. यामध्ये बचत गटांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बचत गटांनी कर्जपुरवठा करून त्यांना जीवनदान देणे सध्यातरी गरजेचे आहे.
अनियमित पाणीपुरवठ्याने त्रस्त
चंद्रपूर : येथील बाबूपेठ परिसरात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. याकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.