राजकुमार चुनारकर
चिमूर : चिमूर तालुक्यातील ८० ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. यासाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. प्रचाराची रणधुमाळी संपल्याने आता प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या हालचालीवर नजर ठेवण्यासोबतच मतदारांवर पैशाची उधळण सुरू झाली आहे. काही ग्रामपंचायतमध्ये शंभर, दोनशे तर आर्थिकदृष्ट्या भक्कम असलेल्या ग्रामपंचायतच्या प्रभागात एका मताला ५०० रुपये भाव फुटला आहे. त्यामुळे उमेदवाराच्या मनात घालमेल असून मतदानाच्या आदल्या दिवशी जागते रहो.... रात्र वैऱ्याची आहे, असे म्हणत सर्वच उमेदवार आपापल्या वॉर्डात खडा पहारा देत असल्याची स्थिती आहे.
लोकशाहीतील निवडणुकीची पहिली पायरी नगर परिषद, ग्रामपंचायत आहे. सरपंच, सदस्यापासून सुरू झालेला आलेख पुढे मंत्रिपदापर्यंत गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणापासून ज्येष्ठांनीही दोन हात करण्याची तयारी केली आहे. माञ यावेळी निवडणुकामध्ये नगर परिषद, नगर पंचायत पाठोपाठ आता ग्रामपंचायतमध्येही पैशाचा वापर होत असल्याचे चित्र आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील देवदर्शन, जेवणाचे लोण आता ग्रामपंचायतपर्यंत पोहोचत पैशाचा वापरही होताना दिसून येत आहे.
बॉक्स निवडणूक केवळ धनदांडग्याचीच
लोकशाही प्रक्रियेत सर्वसामान्याना काही कष्ट न करता भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार आहे. परंतु सध्याची स्थिती पाहिली तर बहुतांश मतदार मताची बोली लावत असल्याचे चित्र नगर परिषदमध्ये दिसून आले. तेच चित्र आता काही ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून येत आहे. त्यामुळे आता निवडणूक लढविणे हे धनदांडग्याचेच काम असल्याचे ऐकायला मिळत आहे.