तेलंगणाला जोडणाऱ्या राज्य मार्गाची दैना
By Admin | Updated: October 12, 2015 01:34 IST2015-10-12T01:34:40+5:302015-10-12T01:34:40+5:30
राजुरा तालुक्यातील राजुरा, देवाडा, सुमठाणा, सोन्डो लक्कडकोट या राज्यमार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

तेलंगणाला जोडणाऱ्या राज्य मार्गाची दैना
खड्ड्यांमुळे अपघातात वाढ : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
देवाडा : राजुरा तालुक्यातील राजुरा, देवाडा, सुमठाणा, सोन्डो लक्कडकोट या राज्यमार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. दिवसेंदिवस अपघातात वाढ होत आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कमालिचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावरुन जाताना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा भास होतो.
या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यात दिवसागणिक वाढच होत आहे. परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधीचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तेलंगणा सीमेलगत असलेले रस्ते फार खराब झालेले आहे. या भागातील बहुतांश जनता तेलगु भाषिक आहेत. त्यांचा संपर्क तेलंगणा प्रदेशाची जास्त असतो. त्यामुळे त्यांना तेलंगणात ये-जा करावी लागते. तेलंगणा प्रदेशाला जोडणाऱ्या या मार्गात महाराष्ट्रातील अनेक गावे येतात. या मार्गावरुन फार मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पादचारी, दुचाकी, चारचाकीधारकांना कमालिचा त्रास सहन करावा लागत आहे.
राज्य शासन जनतेच्या मुलभूत सोयी सुविधाकडे विशेष लक्ष देत असल्याचा दावा करीत आहे. त्यात रस्त्याच्या विकासाला प्राधान्य आहे. या कामासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. दरवर्षी १०० ते १५० कोटी रुपये रस्ते बांधकाम व डागडुजीवर खर्च करूनही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या रस्त्याची अवस्था बिकटच आहे. कितीही पैसा ओतला तरी या रस्त्यावरचे खड्डे काही केल्या बुजत नाही. उलट दिवसेंदिवस ते वाढतच आहे.
राजुरा रेल्वे गेट ते सुमठाणा तुलाना वरुर रोड, सोन्डो, सिद्धेश्वर, आनंदगुडा, जंगुगुडा, पारधीगुडा, लक्कडकोट रस्त्याचे डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे. रस्ते बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे हा पैसा कुठे जिरतो. हे कळायला मार्ग नाही. डांबराचे प्रमाण कमी असते. डांबर पातळ करण्यासाठी एलडीओ नावाचा पदार्थ मिसळावा लागतो. मात्र ते महागडे असल्याने डांबरात केरोसिन वापरले जाते. केरोसिन वापरणे हे नियमबाह्य आहे. केरोसिनमुळे डांबरीकरणाचा दर्जा निकृष्ट होतो. पण त्याकडे दुर्लक्ष करून बांधकाम विभागाचे अभियंते अशा रस्त्यांना सर्रास मंजुरी देतात. त्यामुळे तीन ते चार महिण्यात रस्ते उखडतात. या प्रकारात सर्वांचे हित असल्याने रस्ता कधी उखडेल याचीच सारेजण वाट बघत असतात. यात सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे रस्त्यावर होणाऱ्या वाहतुकीचे निरीक्षणच योग्यरित्या होत नाही. मात्र याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतच आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकांना दहा टनांची मर्यादा देण्यात आली. पण कमी वेळात जास्त वाहतूक करण्याच्या लालसेपोटीएका ट्रकमध्ये १५ ते १८ टन माल भरतात. त्यामुळे रस्त्याचे बेहाल झाले आहेत. (वार्ताहर)