राज्य पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याने केली शेतीकामाच्या निवृत्तीची घोषणा

By Admin | Updated: October 22, 2015 00:44 IST2015-10-22T00:44:47+5:302015-10-22T00:44:47+5:30

वयाची ५० वर्षे काळ्या आईच्या सेवेला समर्पित करून आयुष्याच्या संध्याकाळी वृद्धापकाळामुळे शक्य होत नसल्याने शेतीतून सेवानिवृत्ती घेण्याचा निर्णय...

State award-winning farmer has announced his retirement from agriculture | राज्य पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याने केली शेतीकामाच्या निवृत्तीची घोषणा

राज्य पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याने केली शेतीकामाच्या निवृत्तीची घोषणा

वतन लोणे  घोडपेठ
वयाची ५० वर्षे काळ्या आईच्या सेवेला समर्पित करून आयुष्याच्या संध्याकाळी वृद्धापकाळामुळे शक्य होत नसल्याने शेतीतून सेवानिवृत्ती घेण्याचा निर्णय गोरजा येथील शेतकरी प्रल्हाद गायकवाड यांनी घेतला आहे. गोरजा येथील प्रतिष्ठित शेतकरी असे त्यांचे नावलौकिक असून आज वयाच्या ७२ व्या वर्षी उतारवयामुळे शेती करणे शक्य होत नसल्याची खंत त्यांनी ‘लोकमत’ कडे बोलून दाखविली.
सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता निवृत्तीचे वय सरकारने ठरवून दिले आहे. मात्र एखाद्या शेतकऱ्याने शेतीतून निवृत्त होण्याची ही देशातील पहिलीच घटना असेल, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. जुन्या काळात मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रल्हाद गायकवाड यांनी काही काळ चंद्रपुरातील एका शाळेत शिक्षकाची नोकरीही केली. मात्र, आईच्या आग्रहाखातर नोकरी सोडून त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. केवळ उपजीविकेचे साधन म्हणून शेती न करता एक व्रत म्हणून त्यांनी शेतीची आराधना केली. त्यांच्या कठोर मेहनतीला साद देत काळ्या आईनेही आपल्या कुशीतून भरघोस उत्पन्नाचे दान त्यांना दिले.
आपल्या कल्पकतेने व मेहनतीच्या जोरावर शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून त्यांनी पारंपारिक पिकांसोबतच फळे व भाजीपाल्याचेही उत्पादन घेतले. शेतीतल्या मेहनतीने त्यांना अनेक पुरस्कारही मिळवून दिले. पंचायत राज रौप्य महोत्सवानिमीत्त पंचायत समिती भद्रावती कडून सन १९८७ ला आदर्श कास्तकार पुरस्कार व प्रशस्तीपत्र, तर राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प सिंदेवाहीतर्फे १९९२ साली शेती दिनानिमीत्त आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनात ठेवलेला नमुना उत्कृष्ट ठरल्याबद्दल पुरस्कार व प्रशस्तीपत्र, १९९४ साली आयोजित कोरडवाहू फळांचे प्रदर्शन व स्पर्धेत कलमी बोराच्या नमुन्यास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार व प्रशस्तीपत्र, १९९७ साली दि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, तसेच २०११ साली आयोजित शेतकरी गौरव समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला.
यामध्ये त्यांच्या पत्नी सुमन गायकवाड यांना पोस्टाने घरपोच साडीचोळी देऊन त्यांनाही गौरविण्यात आले. सन १९८९ मध्ये भद्रावती येथील सहकारी शेती खरेदी विक्री समितीचा अध्यक्ष असताना तोट्यात असणाऱ्या समितीला नफा मिळवून दिला, असेही गायकवाड आठवणीने सांगतात.
मागील ५० वर्षांपासून ते शेती करीत आहेत. यंदाचे हे शेवटचे वर्ष असल्याचे त्यांनी जाहीर करून टाकले आहे. तीनही मुलींचे लग्न झाले असल्यामुळे व मुलगा नसल्यामुळे ५० वर्षांची ही परंपरा नाईलाजाने पुढे सुरू राहणार नाही, याची खंत असल्याचे ते सांगतात.
या ५० वर्षांच्या कार्यकाळात ज्या महिलांनी ५० वर्षांपासून त्यांच्या शेतीवर मोलमजुरी केली त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून अशा श्रम सावित्रींचा साडीचोळी देऊन सत्कार त्यांच्याकडून नुकताच करण्यात आला. या श्रम सावित्रींमुळेच मला भरघोस उत्पादन व उत्पन्न मिळाले तसेच राज्यपाल पुरस्कारापर्यंत मजल मारता आली, असे भावपूर्ण उद्गार प्रल्हाद गायकवाड यांनी काढले.

पुरस्कार देताना शासनाकडून थट्टा
साधारण परिस्थिती असतानादेखील उत्तम पद्धतीने शेती केल्यामुळे तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांच्या हस्ते प्रल्हाद गायकवाड यांना सन १९९१ मध्ये मुंबईला सुवर्णपदक व प्रशस्तीपत्र असा पुरस्कार मिळाला होता. मात्र, घरी आल्यानंतर पदक तपासून बघितले असता, कांस्य पदकावर सोन्याचा मुलामा चढवून दिले असल्याचे लक्षात आले. नंतर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी हे पदक जमा करण्यास सांगितले असता, गायकवाड यांनी हे पदक जमा करण्यास नकार दिला. एकदा जे दिले, ते दिले. मी परत करणार नाही, असे सांगितले. शासनही शेतकऱ्यांची थट्टा करते असे पुरस्काराच्या आठवणीबद्दल प्रल्हाद गायकवाड सांगतात.

Web Title: State award-winning farmer has announced his retirement from agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.