अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुुरु
By Admin | Updated: September 1, 2014 23:27 IST2014-09-01T23:27:19+5:302014-09-01T23:27:19+5:30
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत असून २१ सप्टेंबरला नव्या अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. ओबीसी महिलासाठी अध्यक्षपद राखीव असल्याने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुुरु
२१ ला होणार निवड: भाजपा-कांँग्रेससह मित्रपक्षांमध्ये चढाओढ
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत असून २१ सप्टेंबरला नव्या अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. ओबीसी महिलासाठी अध्यक्षपद राखीव असल्याने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विशेष म्हणजे यावेळी कोणता पक्ष आपला अध्यक्ष बसवितो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
५७ सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचे २१ सदस्य आहेत. तर भाजपाचे १८, राष्ट्रवादी काँग्रेस ७, युवाशक्ती संघटना ५, शिवसेना २, शेतकरी संघटना २, बसपा १ तसेच मनसेला एका सदस्यावर समाधान मानावे लागले. दरम्यान भाजपा, राष्ट्रवादी, मनसे, युवाशक्ती एकत्र आल्याने सर्वात जास्त २१ सदस्य निवडून आले असतानाही काँग्रेसला जिल्हा परिषदेवर आपती सत्ता काबीज करता आली नाही. भाजपाचे १८ सदस्य असल्याने अध्यक्षपदी संतोष कुमरे यांची निवड करण्यात आली. तर राष्ट्रवादी कांँग्रेसचे संदीप गड्डमवार यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. एक सदस्य असलेल्या मनसेलाही महिला व बालकल्याण समिती सभापतीपद देण्यात आले. अडीच वर्षाच्या कार्यकाळात अनेक चढाओढ झाली. अनेक योजनांनाही मंजुरी मिळाली. विशेष म्हणजे, विरोध पक्ष असलेल्या काँग्रेसने यावेळी पाहिजे तशी भूमिका बजावली नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. गटनेते असलेले डॉ.सतीश वारजूकर यांनी आपल्या प्रभागात अनेक योजना नेल्याचा आरोपही सभागृहात अनेकवेळा करण्यात आला. २१ सप्टेंबर रोजी अध्यक्षपदाची निवड होणार आहे.
यासाठी राजकीय पक्षांनी पूर्णपणे तयारी सुरु केली आहे.
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असतानाही चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपा-राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता मिळविल्याने राज्यात चंद्रपूर जिल्हा परिषदेतील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. अडीच वर्षाचा कार्यकाळ ही युती पूर्ण करणार नाही, असे भाकितही अनेकांनी त्यावेळी व्यक्त केले होते. मात्र या युतीने आपला कार्यकाळ पूर्ण केला.
यावेळी अध्यक्षपद ओबीसी महिलासाठी राखीव असल्याने चढाओढ वाढली आहे. काँग्रेसमध्ये ओबीसी महिला सदस्यसंख्या आठ आहे. तर भाजपाकडे पाच, युवाशक्ती दोन, मनसेकडे एक ओबीसी महिला सदस्य आहे. सर्व राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी आतापासूनच सुरू झाली आहे. मात्र यात कशी तडजोड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (नगर प्रतिनिधी)