उभे पीक केले उद्ध्वस्त
By Admin | Updated: October 4, 2014 23:24 IST2014-10-04T23:24:04+5:302014-10-04T23:24:04+5:30
शेती कामासाठी व घरच्या आर्थिक कामासाठी एका शेतकऱ्याने पाच टक्के व्याजाने तीन लाख रुपये खासगी सावकाराकडून कर्ज घेतले. त्या मोबदल्यात सावकाराने शेतकऱ्याची सात एक जागा विक्री करुन घेतली.

उभे पीक केले उद्ध्वस्त
आर्वी येथील प्रकार : अवैध सावकाराने आवळला पाश
कोठारी : शेती कामासाठी व घरच्या आर्थिक कामासाठी एका शेतकऱ्याने पाच टक्के व्याजाने तीन लाख रुपये खासगी सावकाराकडून कर्ज घेतले. त्या मोबदल्यात सावकाराने शेतकऱ्याची सात एक जागा विक्री करुन घेतली. जेव्हा पैसे परत देण्यासाठी संबंधित शेतकरी गेला तेव्हा सावकाराने संतापाने मध्यरात्री त्या शेतकऱ्याच्या शेतात तीन ट्रॅक्टर फिरवून शेती उद्ध्वस्त केल्याचा संतापजनक प्रकार गोंडपिंपरी तालुक्यातील आर्वी येथे घडला. याबाबत शेतकऱ्याने लाठी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
आर्वी येथील शेतकरी रमेश मेश्राम याने शेतीच्या कामसाठी अब्दुल अजिज शेख यासिन (रा.लालपेठ कॉलरी चंद्रपूर) याच्याकडून टप्याटप्याने तीन लाख रुपये पाच टक्के व्याज दराने घेतले. मात्र या व्यवहारात या सावकाराने शेतकऱ्याची भूमान क्र. १८५/१ आराजी २.७१ हे. आर शेती विक्री करुन घेतली. व्याजासह तीन लाख रुपये परत केल्यानंतर शेती पुन्हा रमेशच्या नावाने करून देण्याचे तोंडी ठरले. आजच्या बाजार भावाप्रमाणे सदर शेतीची किंमत ३० लक्ष रुपये आहे. शेतकऱ्याने स्वत:जवळ पैसे जमा होताच, सावकाराच्या कर्जाची परतफेड केली व शेती स्वत:च्या नावाने करून देण्याचा तगादा लावला.
मात्र सावकार अब्दुल अजिज शेख यासिन याने शेती हडप करण्याचा डाव रचला होता. त्यासाठी त्याने २८ सप्टेंबरच्या मध्यरात्री रमेश मेश्राम याच्या शेतात तीन ट्रॅक्टर फिरवून कापूस, सोयाबीन व तुरीचे उभे पीक उद्ध्वस्त केले. त्यासोबत रमेशचा भाऊ आर्वी येथील पोलीस पाटील सुरेश मेश्राम याच्या भू.०.९२ हे. आर या शेतातही ट्रॅक्टर फिरवून पीक नांगरुन उद्धवस्त केले. सदर प्रकार सुरेश सकाळी शेतात गेल्यानंतर समजला. त्याने लाठी पोलिसात तक्रार दाखल करून अब्दुल अजिज शेख यासीन, शरद गोपीनाथ ढोके व रमेश नारनवरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. (वार्ताहर)