स्थायी समिती व झोन ३ सभापतिपदासाठी होऊ शकते चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:43 IST2021-02-05T07:43:55+5:302021-02-05T07:43:55+5:30
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती व तीनही झोनच्या सभापतिपदासाठी ५ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत ...

स्थायी समिती व झोन ३ सभापतिपदासाठी होऊ शकते चुरस
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती व तीनही झोनच्या सभापतिपदासाठी ५ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असले, तरी काही असंतुष्ट नगरसेवकांकडून फोडाफोडीचे राजकारण केले जाऊ शकते. स्थायी समिती व झोन क्रमांक ३ च्या सभापतिपदासाठी एकाहून अधिक अर्ज आल्यास निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
याची भनक लागल्यामुळे भाजपने आतापासूनच सावध भूमिका घेतली असून, स्थायी समितीतील भाजप नगरसेवकांना ताडोबा येथे सहलीला पाठविण्यात आले आहे. स्थायी समितीमध्ये सद्यस्थितीत १६ सदस्य आहेत. यातील दहा सदस्य भाजपचे आहेत. त्यामुळे भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. २०१७ मध्ये महानगरपालिकेची निवडणूक झाली. तेव्हा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक असलेले राहुल पावडे सभापतीपदी विराजमान झाले. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही पुन्हा त्यांनाच या पदावर संधी देण्यात आली. सलग चार वर्षे ते स्थायी समितीचे सभापती राहिले. त्यानंतर त्यांनाच उपमहापौर म्हणून संधी देण्यात आली. यामुळे भाजपच्या काही नगरसेवकांत नाराजीचा सूर आहे. आता पंचवार्षिकमधील हे शेवटचे वर्ष आहे. त्यामुळे स्थायी समितीमधील काही असंतुष्ट सदस्य या पदासाठी फिल्डिंग लावण्याच्या तयारीत आहे. मात्र यासाठी या इच्छुकाला इतर सहा सदस्यांना हाताशी धरून भाजपचेही काही सदस्य फोडावे लागणार आहे. मात्र फोडाफोडीचे राजकारण नको म्हणून भाजपच्या स्थानिक पक्षश्रेष्ठींनी त्यांना एकत्र करीत ताडोबा येथे सहलीला पाठविल्याची माहिती आहे.
बॉक्स
यांची नावे चर्चेत
स्याथी समिती सभापतीसाठी भाजपचे गटनेते वसंत देशमुख, देवानंद वाढई व रवी आसवानी यांची नावे चर्चेत आहेत. मात्र वसंत देशमुख यांच्या नावावरच पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. अर्ज सादर करताना त्यांचे नाव रितसर जाहीर केले जाऊ शकते.
बॉक्स
स्नेहल रामटेके यांनी घेतला अर्ज
५ फेब्रुवारीला झोन सभापती पदाचीही निवडणूक होणार आहे. या तीनही झोनसाठी भाजपने अद्याप नावे जाहीर केली नसली, तरी झोन क्रमांक १ साठी छबू वैरागङे, झोन क्रमांक २ साठी संगीता खांडेकर व झोन क्रमांक ३ साठी अंकुश सावसाकडे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र झोन क्रमांक १ चे विद्यमान सभापती बंटी चौधरी हे पुन्हा या पदावर विराजमान होण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. झोन क्रमांक ३ मध्ये विरोधी पक्षातील स्नेहल रामटेके यांनी अर्ज घेतला आहे. ते या पदावर येण्यासाठी मोर्चेबांधणी करीत असून, झोनमधील नगरसेवकांच्या एक-दोन बैठकाही त्यांनी घेतल्या आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केला, तर येथील निवडणूक चुरशीची होऊ शकते. त्यामुळे भाजप नगरसेवक धास्तावले आहेत.