चुकीच्या औषध फवारणीने कपाशी करपली
By Admin | Updated: September 15, 2014 00:02 IST2014-09-15T00:02:27+5:302014-09-15T00:02:27+5:30
पेरणीनंतर कपाशीचे पीक बहरु लागले असताना तण नाशकासाठी कृषी केंद्रातून औषधी घेतली. मात्र कृषी केंद्रधारकाने चुकीची औषधी देवून शेतकऱ्याला त्याची फवारणी करण्याचा सल्ला दिला.

चुकीच्या औषध फवारणीने कपाशी करपली
चिमूर : पेरणीनंतर कपाशीचे पीक बहरु लागले असताना तण नाशकासाठी कृषी केंद्रातून औषधी घेतली. मात्र कृषी केंद्रधारकाने चुकीची औषधी देवून शेतकऱ्याला त्याची फवारणी करण्याचा सल्ला दिला. मात्र फवारणी केल्यानंतर दोन-तीन दिवसातच अख्खे कपाशीचे पीक कोमेजून गेले. त्यामुळे नवेगाव पेठ येथील शेतकरी नरेंद्र शिरभैये यांचे लाखों रुपयाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चिमूर तालुक्यातील नवेगाव पेठ येथील रहिवाशी नरेंद्र भैयालाल शिरभैये याची वडाळा पैकु तलाठी साजाअंतर्गत येत असलेल्या भु.क्र. ६५ वर शिरभैये यांनी १० एकरात कपाशीची लागवड केलीे. कपाशीचे निंदन, खुरपण, डवरणी योग्यप्रकारे केल्याने कपाशीचे पीक चांगल्या स्थितीत होते. कपाशीमध्ये पुन्हा कचरा होऊ नये, गवत वाढू नये, याकरीता शिरभैये यांनी चिमूर येथील मासळ चौकातील जय श्रीहरी अॅग्रोटेक येथून जाऊन आवश्यक असलेली गरुड किंवा आलकील ही तणनाशक औषधी मागितली. मात्र कृषी केंद्रधारकाने ग्लॉयसोपिक गोदरेज नावाचे तणनाशक औषध शिरभैये यांना दिले.
ग्लॉयसोपिक गोदरेज नावाचे तणनाशक औषधाची शिरभैये यांनी आपल्या १० एकरातील कपाशीवर फवारणी केली असता एक ते दोन दिवसातच कपाशी कोमजून तिची अवस्था मरणासन्न झाली. कपाशी सुकण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने जवळपास हातात आलेले पीक चुकीच्या औषधीने पुर्णत: नष्ट होण्याच्या मार्गावर येवून ठेपले आहे. चुकीची औषधी कृषी केंद्रधारकाने दिल्याची माहिती शेतकरी नरेंद्र शिरभैये यांनी पत्रकारांना दिली. असून त्यांच्या चुकीच्या औषधीमुळे माझ्या शेतातील १० एकरातील कपाशी नष्ट होत असून लाखो रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
शेतकऱ्यांना चुकीचे औषधी देणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करण्याची मागणी सदर शेतकऱ्याने केली आहे. चुकीचा औषध पुरवठा करणाऱ्या कंंपन्या व कृषी केंद्रामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून कृषी विभाग याकडे डोळेझाक करीत आहे. या कृषी केंद्र चालकांना कृषी विभागाचा आशीर्वाद असल्याचा आरोपही शिरभैये यांनी केला आहे. या प्रकरणी ग्राहक संरक्षण मंचाकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)