लोकवर्गणीतून केली शाळेची भिंत बोलकी

By Admin | Updated: May 26, 2017 00:15 IST2017-05-26T00:15:39+5:302017-05-26T00:15:39+5:30

गावाशी कोणतेही नाते नसताना अमेरिकेत स्थायिक झालेल्या राजशेखर चिंतापल्ली यांनी थेट सातासमुद्रापलिकडून

Speak to the wall of the school | लोकवर्गणीतून केली शाळेची भिंत बोलकी

लोकवर्गणीतून केली शाळेची भिंत बोलकी

ग्रामस्थांचा सहभाग : भिंतीही देत आहेत विद्यार्थ्यांना संदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गावाशी कोणतेही नाते नसताना अमेरिकेत स्थायिक झालेल्या राजशेखर चिंतापल्ली यांनी थेट सातासमुद्रापलिकडून कोरपना तालुक्यातील हेटी येथील जिल्हा परिषद शाळेला पाच हजार रुपयांची मदत पाठविली होती. त्यांचा आदर्श घेऊन गावकऱ्यांनीसुध्दा लोकवर्गणी गोळा केली. त्यातून शाळेच्या संरक्षण भिंतीची रंगरंगोटी करण्यात आली. शाळेच्या बोलक्या संरक्षण भिंतीमुळे विद्यार्थी हसतखेळत शिकू लागले आहेत. यातून येथील गावकऱ्यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
मुख्याध्यापक अरुण उमरे यांचे मित्र राजशेखर चिंतापल्ली हे अमेरिकेमध्ये मोठ्या पदाच्या नोकरीवर आहेत. त्यांना शिक्षणाची आवड असल्यामुळे शाळेला पाच हजार रुपयांची मदत पाठविली. तसेच कामठी येथील मनीष नेवारे यांनी त्यांच्या प्रदीप्ती नावाच्या मुलीच्या आग्रहाखातर शाळेला मदत पाठविली. या बाहेरून येणाऱ्या मदतीने गावकरी भारावले. बाहेरचे व्यक्ती आपल्या गावातील शाळेला मदत करीत आहे, तेव्हा आपणही शाळेसाठी काहीतरी केले पाहिजे, असे गावकऱ्यांना वाटले. यावर गावकऱ्यांनी एकत्र येऊन विचारविनिमय केला व शाळेला आणखी चांगले बनविण्यासाठी लोकवर्गणी गोळा करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून २५ हजारांचा निधी गोळा केला. या निधीतून शाळेची रंगरंगोटी करण्यात आली. परमडोह येथील कलावंत रवींद्र ठाकरे यांनी उत्तम असे रेखाचित्र काढली.
विद्यार्थी शाळेत आल्यावर प्रसन्न असल पाहिजे, शाळेच्या वास्तूतूनही त्यांना काहीतरी शिकायला मिळाले पाहिजे, या हेतूने ही रंगरंगोटी करण्यात आली. शाळेची सुरक्षा भिंत व इतर भिंती बोलक्या करण्यात आल्या आहेत. या शाळेची प्रत्येक भिंत काही ना काही संदेश देते.
हेटी येथील ही शाळा कोरपना-वणी मार्गावर आहे. या मार्गाने येता-जाता कोरपना येथील आयटीआयचे प्राचार्य संजय तेलतुमडे, रमेश बोरडे, नेलाकूर्ती कोंडय्या सावकार हेदेखील शाळेच्या बोलक्या भिंतीने भारावले व त्यांनी शाळेला आर्थिक मदत देऊ केली. अध्ययनासोबतच या शाळेतील विद्यार्थी चालता-बोलता, हसता-खेळताही काही ना काही शिकत आहेत. शाळेत अनियमित असणारे विद्यार्थीही आता नियमित झाले आहेत.

Web Title: Speak to the wall of the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.