लघु व्यावसायिक आर्थिक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:29 IST2021-01-03T04:29:12+5:302021-01-03T04:29:12+5:30
चंद्रपुरात एटीएमध्ये नोटांचा तुटवडा चंद्रपूर : शहरात काही ठिकाणी एटीएम मशीन बसविण्यात आल्या. मात्र मागील काही दिवसांपासून पैशाचा ...

लघु व्यावसायिक आर्थिक संकटात
चंद्रपुरात एटीएमध्ये नोटांचा तुटवडा
चंद्रपूर : शहरात काही ठिकाणी एटीएम मशीन बसविण्यात आल्या. मात्र मागील काही दिवसांपासून पैशाचा ठणठणाट दिसून येत आहे. तांत्रिक अडचणीमुळे एटीएम नेहमी बंद असतात. त्यामुळे खातेदारांना अडचणींना सामोरा जावे लागत आहे.
बसस्थानकाचा प्रश्न अद्यापही रेंगाळलेलाच
कोरपना : तालुक्याची निर्मिती होऊन अनेक वर्षांचा कालावधी झाला. या कालावधीमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बसस्थानक उभारू, असे गाजर दाखविले. मात्र अद्यापही हा प्रश्न निकाली निघाला नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
कोचिंग संचालकांचे आर्थिक नुकसान
चंद्रपूर : गावात ट्युशन क्लास घेऊन उदरनिर्वाह करणाऱ्या बेरोजगार युवकांचे कोरोनामुळे मोठे नुकसान झाले आहे. नवे वर्ष सुरु झाले. तरीही शाळा सुरु झाल्या नाही. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी अद्यापही शिकवणी लावली नाही. परिणामी गावातील बेरोजगार युवकांचे आर्थिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, काही युवकांनी स्वयंप्रेरणेने गावात शिकवणी सुरू केली आहे. मात्र त्यांना पैसे मिळत नसल्याने जगायचे कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
रस्त्यावरील रेडियम गायब
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडियम लावण्यात आले होते. मात्र सद्यस्थितीत रेडियम गायब झाले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक रस्त्यावर रेडियम लावून अपघात टाळावा, अशी मागणी केली जात आहे.
वनसडी ते पिपर्डा रस्त्यावर खड्डे
कोरपना : कोरपना तालुक्यातील वनसडी ते पकडीगुड्डम धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. रस्त्यावरुन वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. या मार्गावर पिपर्डा, कारगाव, धनकदेवी, मरकागोंदी, जिवतीला जाण्याचा एकमेव मार्ग आहे. परिणामी रस्त्यावर मोठी वर्दळ असते.मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
स्टंटबाजीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला
चंद्रपूर : अलिकडे युवा अवस्थेतील तरुणांमध्ये भरधाव वाहन चालवणे व स्टंटबाजीची जीवघेणे क्रेझ निर्माण झाली आहे. रात्री आणि दिवसादेखील हा प्रकार जोरात चालला असल्याने रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. याकडे पोलीस प्रशासनाले लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
या क्रेझपोटी हे तरुण रात्री उशिरापर्यंत इकडे-तिकडे दुचाकी घेऊन हुंदडत आहेत. जिल्ह्यातील काही शहरातील रस्ते धोकादायक आहे. त्यामुळे वाहनधारक व पादचाऱ्यांना या मार्गावरून जरा जपूनच चालावे लागते आहे. यातच दुचाकीधारकांच्या स्टंटबाजीच्या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. यामुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चंद्रपुरात डासांचा प्रादुर्भाव वाढला
चंद्रपूर : शहरातील अनेक वॉर्डात नाल्यांची साफसफाई न झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. महानगर पालिकेकडून काही वॉर्डात फवारणी करण्यात आली. त्यानंतर ही कामे बंद आहेत. जुनोना, बाबुपेठ व अन्य परिसरात अद्यापही फवारणी करण्यात आली नाही. येथील हॉस्पिटल वाॅर्डात तर नाल्या चोकअप झाल्या आहेत.
ओव्हरडोल वाहतुकीला आळा घालावा
चंद्रपूर : नागरी वसाहतीमध्ये जडवाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील अंतर्गत भागातील लहान रस्त्यांवरही अवजड वाहने नेण्यात येत असल्याने या रस्त्यांची पूर्णत: वाट लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
अनुदान देण्याची मागणी
चंद्रपूर : सरकी ढेपीचे तसेच इतरही साहित्याचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह दूध उत्पादक संकटात सापडले आहे. शासनाने ढेपचे दर कमी करून दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकरी दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशी, शेळ्या आदी जनावरे पाळत आहे. मात्र वाढत्या महागाईमुळे हा व्यवसाय डबघाईस येत आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये चंद्रपूर जिल्हा दूध उत्पादनामध्ये मागे आहे.त्यामुळे दुग्ध उत्पादकांना अनुदान दिल्यास अनेकजण व्यवसायामध्ये येतील, अशी आशा आहे.
झोपडपट्टीधारकांना स्थायी पट्ट्याची मागणी
भद्रावती : गेल्या वर्षी आंदोलन केल्यानंतर शहरातील झोपडीवासीयांना कायमस्वरूपी पट्टे मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करून झोपडपट्ट्या अधिकृत जाहीर करु, असे आश्वासन भद्रावती नगर परिषदेद्वारे देण्यात आले होते. मात्र पालिकेने आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे शासनाकडून येथील झोपडपट्टीवासीयांना कायमस्वरूपी पट्टे मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे, असा आरोप होत आहे.
चंद्रपुरात रस्ते सफाईनंतर ती माती पुन्हा रस्त्यावरच
चंद्रपूर : महानगर पालिकेचे सफाई कर्मचारी दररोज सकाळी न चुकता शहरातील रस्त्यांची सफाई करतात. दरम्यान रस्त्यावर असलेली धूळयुक्त माती रस्त्याच्या कडेला वा रस्ते दुभाजकाच्या कडेला जमा करतात. मात्र ती माती नंतर उचलल्या जात नाही. यानंतर पुन्हा वर्दळीला सुरुवात होते. वाहनांमुळे ती माती पुन्हा रस्त्यावर पसरते. दुसऱ्या दिवशी पुन्हा हाच प्रकार होतो. याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
ढिगाऱ्यावर वन्यप्राण्यांचा वावर
गोवरी : परिसरातील वेकोलिने तयार केलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडूपे तयार झाल्याने या ठिकाणी दिवसरात्र वन्यप्राण्यांचा संचार सुरू आहे. जंगलालगत असलेली शेती वन्यप्राण्यांकडून उद्ध्वस्त केली जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.