निधीअभावी बसस्थानकाचे काम संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST2021-03-15T04:26:09+5:302021-03-15T04:26:09+5:30
लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज सावली : तालुकानिर्मितीच्या तब्बल २८ वर्षांनंतर सावली येथे बसस्थानक मंजूर झाले. मात्र मागील दीड ...

निधीअभावी बसस्थानकाचे काम संथगतीने
लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
सावली : तालुकानिर्मितीच्या तब्बल २८ वर्षांनंतर सावली येथे बसस्थानक मंजूर झाले. मात्र मागील दीड वर्षापासून सदर बसस्थानकाचे काम संथगतीने चालू आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
परिवहन महामंडळाने सुमारे २.६४ कोटी रुपये मंजूर करून सावली येथे सर्व सुविधांयुक्त अशा बसस्थानकाच्या इमारत बांधकामाला सुरुवात केली. कोरोना लाॅकडाऊनच्या काळात काही दिवस बंद असलेले काम पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र निधीअभावी बसस्थानकाचे काम संथगतीने सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. सावली शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे दुपदरीकरणाचे काम करण्यात आले. त्यावेळी अनेक झाडे तोडण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरच ताटकळत राहावे लागत आहे. बांधकामाचा निधी अजूनही मिळाला नसल्याने बांधकाम संथगतीने होत असल्याचे कंत्राटदाराचे म्हणणे आहे.
बसस्थानकाच्या बांधकामाची मागणी केल्याच्या कित्येक वर्षांनंतर सावली तालुका मुख्यालयात बसस्थानक मंजूर झाले. कामाला सुरुवातही झाली. त्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. पण कोरोनाच्या सावटामुळे प्रवाशांच्या आनंदावर विरजण पडले. आणि तो आनंद औट घटकेचाच ठरला. प्रवाशांना उन्हाचे चटके सहन करून रस्त्यावर ताटकळत राहावे लागत असल्याने मनःस्ताप सहन करावा लागत आहे. येणारा कालावधी तीव्र उन्हाळ्याचा असल्याने पाणपोई आणि तात्पुरता मंडप टाकून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करावी. याकरिता लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.