कोरोनाच्या लढ्यात जि.प.चे सहा हजारांवर कर्मचारी कर्तव्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:01 IST2020-04-23T05:00:00+5:302020-04-23T05:01:23+5:30
गावागावात सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व विभागांचे खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक तसेच गावातील स्वच्छता कर्मचारी असे सर्वजण कोरोना विरोधात संघर्ष करीत आहेत.

कोरोनाच्या लढ्यात जि.प.चे सहा हजारांवर कर्मचारी कर्तव्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. यात जिल्हा परिषदही मागे नसून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी असे सहा हजारांपेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. प्रादूर्भाव रोखणे हेच एकमेव उद्दिष्ट असल्याने प्रशासनाने यावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत केले आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेद्वारे उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी कर्मचाऱ्यांपासून अधिकारीही आपले कर्तव्य बजावत आहे.
गावागावात सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व विभागांचे खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक तसेच गावातील स्वच्छता कर्मचारी असे सर्वजण कोरोना विरोधात संघर्ष करीत आहेत.
जिल्ह्यात सहा हजारांपेक्षा जास्त कर्मचारी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे आपले कर्तव्य पार पाडत आहे. जिल्ह्यात आठशेच्यावर ग्रामपंचायती आहेत. याठिकाणी कर्मचारी जोखीम पत्करुन काम करीत आहेत.
या काळात गावात नियमित स्वच्छता, पाणीपुरवठा करणे, कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, नागरिकांमध्ये खबरदारीसाठी जनजागृती यासह अन्य आवश्यक कामकाज सुरु आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारीसुद्धा उपाययोजनांचा सातत्याने आढावा घेत आहेत. नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सीईओ सरपंचासोबत संवाद साधत असल्यामुळे प्रत्येकांचे मनोबल वाढत आहे.
या कर्मचाऱ्यांवर अधिक भार
जिल्ह्यात आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, विस्तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक याशिवाय अन्य कर्मचारी असे एकूण सहा हजारावर कर्मचारी कोरोना विरोधातील कर्तव्य बजावत आहेत.