लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : फेब्रुवारी २०२५ ते मे २०२५ दरम्यान जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसल्याने ३ हजार ७४०.७७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. शासनाने मंगळवार, २२ जुलै रोजी जिल्ह्यासाठी नऊ कोटी ८४ लाख ५८ हजारांची नुकसानभरपाई मंजूर केली. हा निधी लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात विविध पिकांची लागवड केली होती. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये लागवडीचे क्षेत्र वाढले. पिकांची स्थिती उत्तम असताना अवकाळी वादळी पाऊस व गारपीटने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. प्रचंड वेगाने असलेल्या वादळी वाऱ्यामुळे दाणादाण उडाली होती.
वाट पाहून अनेकांनी काढले कर्जरब्बी हंगामात अवकाळीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात तरी मदत मिळेल म्हणून वाट पाहिली. अखेर हंगाम तोंडावर आला असताना कर्ज काढून शेतकरी खरिपाच्या कामाला लागले. शासनाने निधी मंजूर केला. परंतु, वाटप विलंब झाल्यास पुन्हा आर्थिक संकटांना सामोरे जावे लागेल, अशी स्थिती आहे.
असे झाले नुकसान व मंजूर निधीमार्च २०२५ मध्ये १५७.७५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. ३३३ शेतकऱ्यांना फटका बसला. या शेतकऱ्यांना ४२८.२७ लाख मंजूर झाले. एप्रिलमध्ये ५१३.३४ हेक्टर बाधित झाले. ७२९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. २५.८३ लाखांचा निधी मंजूर झाला. मे २०२५ मध्ये सर्वाधिक ३ हजार ६१.६८ हेक्टर क्षेत्रातील पीक उद्ध्वस्त झाले. याचा फटका तब्बल ४ हजार ६६ शेतकऱ्यांचे बसला. या शेतकऱ्यांना ५२०.४८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
११ तालुक्यांना दिलासाअवकाळीचा सर्वात मोठा फटका ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, चिमूर, मूल, सावली, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, पोंभूर्णा व भद्रावती तालुक्याला बसला होता. कृषी व महसूल विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण करून शासनाकडे अहवाल सादर केला होता.