Six killed in Chandrapur truck overturn | चंद्रपूर जिल्ह्यात वरातीचा मेटॅडोर उलटून चार ठार; दारु पिऊन चालवली गाडी

चंद्रपूर जिल्ह्यात वरातीचा मेटॅडोर उलटून चार ठार; दारु पिऊन चालवली गाडी


लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: लग्न आटोपून परत निघालेल्या वऱ्हाडी मंडळीचा मेटॅडोर उलटून झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची घटना सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार गावाजवळ गुरुवारी दुपारी घडली.
रत्नापूर येथे लग्न आटोपून हा मेटॅडोर (क्र. एम.एच. ३१ पी क्यू ३९१५) सिंदेवाहीतील एकारा येथे जात होती.  लग्नात दारु पिऊन धुंद झालेल्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही मेटॅडोर झाडावर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, हा मेटॅडोर संपूर्णपणे उलटला व त्यातील वऱ्हाडी मंडळी एकमेकांवर आदळून दबली गेली. अपघातग्रस्त व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. 
या अपघातात दोन महिला व दोन पुरुष जागीच गतप्राण झाले तर २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या परिसरात सर्वत्र सामान विखुरलेले व रक्ताचा सडा पडल्याचे दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आणत होते. 
या घटनास्थळापासून जवळच रेल्वेचे फाटक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी हे फाटक ओलांडून जावे लागणार होते. येथून जात असलेल्या मालगाडीला नागरिकांनी काही काळासाठी रोखून धरले व जखमींना रुग्णवाहिकेतून रेल्वे रुळ ओलांडून नेण्यासाठी मदत केली. 

Web Title: Six killed in Chandrapur truck overturn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.