आमदार निधीच्या खर्चात श्यामकुळे पुढे
By Admin | Updated: July 24, 2014 23:46 IST2014-07-24T23:46:40+5:302014-07-24T23:46:40+5:30
मतदार संघातील विकास कामांसाठी प्रत्येक आमदारांना दरवर्षी दोन कोटी असा पाच वर्षांत १० कोटी रूपयांचा निधी दिला जातो. हा निधी खर्च करण्याची बहुतेकांमध्ये अहमहिका लागत असली

आमदार निधीच्या खर्चात श्यामकुळे पुढे
गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूर
मतदार संघातील विकास कामांसाठी प्रत्येक आमदारांना दरवर्षी दोन कोटी असा पाच वर्षांत १० कोटी रूपयांचा निधी दिला जातो. हा निधी खर्च करण्याची बहुतेकांमध्ये अहमहिका लागत असली तरी चालू आर्थिक वर्षात निधी खर्च करण्यात आमदार नाना श्यामकुळे आघाडीवर आहेत. त्या खालोखाल राजुराचे आमदार सुभाष धोटे यांचा क्रमांक लागतो. तर, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे यांनी मात्र या वर्षात छदामही निधी खर्च केलेला नाही.
यंदाच्या चालू आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल ते जून-२०१४ अखेरची ही आमदार निधीतील खर्चाची स्थिती आहे. मात्र गतवर्षी एप्रिल-२०१३ ते मार्च-१४ या काळात जिल्ह्यातील सहाही आमदारांचा निधी १०० टक्के खर्च झाला आहे. यंदाचे आर्थिक वर्ष सुरू होवून जवळपास चार महिने उलटले आहे. तोंडावर विधानसभा निवडणुका आहेत.
चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे यांनी आपल्या मतदारसंघात ५९ कामे मंजूर केली आहेत. त्यांना एक कोटी ४१ लाख ३८ हजार रूपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या सर्व कामांवर मिळून एक कोटी १५ लाख ९० हजार रूपयांचा खर्च झाल्याची नोंद आहे. मागील आर्थिक वर्षात त्यांनी सुचविलेल्या ४७ कामांवर २ कोटी रूपये निधी खर्च झाला आहे.
निधीच्या खर्चाला मंजुरी देण्यात दुसरा क्रमांक राजुराचे आमदार सुभाष धोटे यांचा लागतो. त्यांनी आपल्या मतदार संघात २५ कामे मंजूर केली असून प्रशासकीय मंजुरी दिलेल्या कामांची अंदाजित किंमत ६९ लाख १५ हजार रूपये आहे. मात्र या कामांवर अद्याप कसलाही खर्च झालेला नाही. गतवर्षी त्यांनी ६० कामे सुचविली होती. त्यावर २ कोटी रूपयांचा निधी खर्च झाला होता.
तिसरा क्रमांक चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांचा लागतो. गेल्या चार महिन्यात त्यांनी १४ कामे मंजूर केली असून त्याची प्रशासकीय किंमत २२ लाख ८८ हजार रूपये आहे. त्यांवर ६० लाख ७१ हजार रूपयांचा खर्च झाला आहे. गतवर्षी त्यांनी ५८ कामे मंजूर करून त्यावर २ कोटी रूपयांचा निधी खर्च केल्याची नोंद आहे.
चवथा क्रमांक बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा लागतो. त्यांनी गेल्या चार महिन्यात जूनअखेरपर्यंत आपल्या मतदार संघात ११ कामे मंजूर केली आहेत. त्यासाठी २३ लाख ५९ हजार रूपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली असून ६६ लाख ६३ हजार रूपयांचा खर्च झाला आहे. त्यांनी मागील आर्थिक वर्षात ७२ कामे केली होती. त्यावर २ कोटी रूपयांचा खर्च झाला होता.
पाचवा क्रमांक ब्रह्मपुरीचे आमदार अतुल देशकर यांचा लागतो. या वर्षात त्यांनी केवळ सहा कामे मंजूर केली. त्यासाठी १६ लाख ६१ हजार रूपयांची प्रशाकीय मंजुरी असून खर्च ६० हजार रूपयांचा झाला आहे. मागील वर्षी त्यांनी १२२ कामे मंजूर करून निधी पूर्णत: खर्च केला होता.
खर्चात सहाव्या क्रमावर वरोऱ्याचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे यांचा क्रमांक लागतो. या आर्थिक वर्षात त्यांनी जूनअखेर एकाही कामांना मंजुरी न दिल्याने त्यांच्या नावे सध्यातरी शून्य कामे आहेत. अर्थातच कसलाही निधी खर्च झाला नाही. असे असले तरी, गतवर्षीच्या कामांसाठी ६२ लाख २१ हजार रूपयांचा निधी या चार महिन्यात खर्च झाल्याचे दाखविले जात आहे. मागील वर्षी त्यांनी मतदार संघात ५९ कामांना मंजुरी देवून २ कोटींचा निधी खर्च केला होता.